कळवण । प्रतिनिधी
कळवण तालुक्यातील रवळजी परिसरात शिवरस्ता व पांदण रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात कुठल्याही अधिकार्यांनी अथवा लोकप्रतिनिधींनी या रस्त्यावरून जाऊन दाखवावे, असे आवाहन रवळजी (निकम वस्ती) व चारणवाडी शिवरस्ता येथील शेतकर्यांनी केले आहे.
रवळजी परिसरातील शेजारील गावात शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते आहेत. या रस्त्यांची गावनकाशा व महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र दुरुस्ती व देखभाल अभावी बहुतांश पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. सध्या खरीप हंगामात शेतकर्यांचा कांदा, टोमॅटो, मिरची व इतर पिके व शेतमाल काढणी चालू आहे. आठवड्यापासून बेमोसमी पावसामुळे शेताचे पाणी शिवार पांदण रस्त्यावर साचल्याने व मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे साधी दुचाकी सुद्धा येणे - जाणे साठी कठीण झाले आहे. ट्रॅक्टर, पिकअप, आयशर आदी मालवाहतूक वाहने तर जाणे - येण्यासाठी अशक्य झाली आहेत. यामुळे शेतकर्यांचे असे हाल होत असल्याने सुध्दा रवळजी परिसरातील पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याकरिता लोकप्रतिनिधी सह शासन व प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे या पांदण रस्त्याचा वनवास आता तरी संपणार का ? असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात घर करून आहे. परिसरातील अनेक पांदण रस्त्याचे रोजगार हमी व इतर योजनेतून अकुशल काम झाले आहे. काही शिवाररस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हे शिवकालीन पुरातन शिवपांदण रस्ते पायवाट म्हणून अजूनही वापरले जात आहे. पांदण रस्त्यांची पावसाळ्यामध्ये फार दयनीय अवस्था होत असते. ज्या शेतकर्यांना शेतात जागा आहे असे शेतकरी पावसापूर्वीच खत, बियाणे शेतात नेऊन ठेवतात. परंतु ज्यांच्याकडे जागा नाही त्या शेतकर्यांनी काय करावे, असा प्रश्नही शेतकर्यांना भेडसावत आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतमालाची ने- आण करणे, पेरणी करण्याकरिता मजूर नेणे, बैलगाडीने किंवा ट्रॅक्टरने शेती उपयोगी अवजारे व खत किंवा तत्सम साहित्य पोहोचवणे याकरिता पावसाळ्यात पांदण रस्ता चिखलमय असल्याने शेतकर्यांना फार अडचणींचा सामना करावा लागतो. रवळजी परिसरातील शिवपांदण रस्त्याचे नुतणीकरण करून पुनरुज्जीवन करावे अशी मागणी बाळासाहेब जाधव, अशोक निकम, रमेश भालेराव, बाळासाहेब निकम, दिपक गांगुर्डे, दिपक जाधव, दिपक निकम, संदिप पवार, आबा निकम, कन्हू जाधव, बापू जाधव, पप्पू भालेराव, नाना कोते, सागर गायकवाड, रावसाहेब भालेराव आदींनी केली आहे.