दिंडोरी । मनोज पाटील
दिंडोरी - पेठ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत वादळी वार्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकर्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतीपिकांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून त्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी अंबानेरचे माजी सरपंच संतोष रहेरे यांनी केली आहे.
टोमॅटो, कांदा, गहू, कारले, भोपळे, पालेभाज्या यांसारख्या नगदी पिकांकडे आस लावून बसलेला असतांना अनपेक्षित अवकाळी पावसाने बळीराजाने बघितलेले स्वप्न अवकाळीच्या पुरात धुवून नेले. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे मेताकुटीला आलेला बळीराजा अक्षरशः हवालदील झाला आहे. उसनवार करून उभ्या केलेल्या भांडवलातून शेतात घाम गाळून पिकवलेला शेतमाल एका क्षणात नष्ट होतो या सारखं दुसरं दुर्दैव काय असू शकते. मुलांचे शिक्षण, कौटुंबिक गरजा, दुकानदारांची देणी, बँकांचे कर्ज कसे फेडणार या विचाराने बळीराजा मानसिक दृष्ट्या कमकुवत झाला आहे. संपूर्ण जगाला तारणहार ठरलेल्या या पोशिंदे याला सध्या वाईट दिवस आले असून काय करावे व काय करू नये असा प्रश्न या शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे हसावे की रडावे अशा स्थितीमध्ये सध्या बळीराजा सापडला आहे. अनेक शेतकर्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्पर्धेच्या युगामध्ये नवनवीन प्रयोग केले असता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोडले असूनही पूर्णता बळीराजा आता खचला आहे. त्यामुळे पंचनामे करून त्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी अंबानेरचे माजी सरपंच संतोष रहेरे यांनी केली आहे.