महाराष्ट्र ट्रायबल न्युज

चिंचपाडा (खो )येथे जलथॉन-२०२६ उपक्रमाचा भव्य प्रारंभ.

खोकरविहिर l प्रतिनिधी:- चिंचपाडा (खो.), ता. सुरगाणा, जि. नाशिक येथे रविवार दि. ०७ जून २०२६ रोजी जलथॉन-२०२६ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन आणि निसर्गसंरक्षण या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमाच्या माध्यमातून ११ गावांच्या सर्वांगीण जलव्यवस्थापन आराखड्याला दिशा देण्यात आली.
    या उपक्रमाचे आयोजन जलपरिषद मित्र परिवार, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (वीजेटीआय), मुंबई, ऋणमुक्त सेवाभावी फाऊंडेशन , नाशिक आणि आयडियाझम सामाजिक संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
गाव नकाशे उद्घाटन व जलमित्र प्रशिक्षण उद्घाटनप्रसंगी प्रा. इंजि. प्रविण चौधरी (वीजेटीआय , मुंबई) यांच्या हस्ते ११ गावांच्या जलमित्र स्वयंसेवकांसाठी तयार करण्यात आलेल्या जलस्रोत नकाशांचे उद्घाटन करुन वाटप केले. या नकाशांच्या आधारे गावनिहाय जलस्रोत मॅपिंग, डेटा संकलन व जलव्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले.
प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन
   या प्रसंगी आयडियाझम संस्थेचे अध्यक्ष नारायण गभाले यांनी पाणी व निसर्ग संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करताना महाराष्ट्रातील दुष्काळी तसेच अतिवृष्टीग्रस्त भागांचे उदाहरण देऊन जलसंधारणाची गरज अधोरेखित केली.
     प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. रुपल गुजराथी (ऋणमुक्त सेवाभावी फाऊंडेशन , नाशिक), तसेच विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहभागी गावे व ग्रामविकासाचा संकल्प
     चिंचपाडा, भेनशेत, चिऱ्याचापाडा, आमदा (बाहे), कळमणे, खिर्डी, केळावण, बेडसे, गुरटेंबी, भाटी आणि ठाणगाव या गावांचा या उपक्रमात समावेश आहे. या सर्व गावांच्या जलस्रोत व्यवस्थापनासाठी एकत्रित आराखडा तयार करण्याचा संकल्प करण्यात आला.
शासकीय व संस्थात्मक सहकार्य
    या उपक्रमाला वनविभाग पश्चिम नाशिक, वन विकास महामंडळ, पाणीपुरवठा विभाग, मृदा व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग, सामाजिक वनीकरण विभाग तसेच पंचायत समिती यांचे सहकार्य  मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला.
जलमित्र जलदूत यांचे सामाजिक योगदान
     या उपक्रमात स्थानिक जलमित्र स्वयंसेवकांची निवड करण्यात आली असून टी-शर्ट वाटप व प्रशिक्षणाद्वारे त्यांना जबाबदारी देण्यात आली. यामध्ये जलदूत म्हणून दिपक गुप्ते, विजय कांबळे, विवेक जक्कानी, तसेच सौ. श्वेता झुनझुनवाला, सौ. निशिगंधा कुऱ्हाडे, प्रसाद बोडस, अशोक कलबाग, योगेश कर्णिक, धनंजय महाजन यांचे विशेष योगदान राहिले.
टी-शर्ट उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण पुढाकार ग्रुप, वीजेटीआय व आयआयटी संबंधित सहयोगी समूहांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
गाव पाणी आराखडा संकलनाचे उद्दिष्ट
    या उपक्रमांतर्गत गावातील विहिरी, बोअरवेल, तलाव, ओढे, झरे, जलसाठे यांचे GPS मॅपिंग, पाण्याची उपलब्धता, हंगामी बदल, जलगुणवत्ता, जलसंवर्धन संरचना तसेच वृक्षलागवडीसाठी संभाव्य क्षेत्रे यांचा सविस्तर अभ्यास करण्यात येणार आहे.यामध्ये समर इंटरशिप प्रशिक्षण विध्यार्थी सामाजिक कॉलेज नाशिक विध्यार्थी संकेत देनक व विजेआयटी विध्यार्थी शुधांशु धारणे,जानव्ही शिराळे,स्वेता पाटील, रुचा केंद्रे यांचा ११ गावात मॅपिंग, आराखडा करण्यासाठी असणार आहे.
संयोजन व आभार
    कार्यक्रमाचे संयोजन देविदास कामडी आणि चिंचपाडा ग्रामस्थांनी केले. समारोपप्रसंगी योगेश महाले यांनी सर्व मान्यवर, ग्रामस्थ, जलमित्र व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानले.
यावेळी देविदास गावित, पांडुरंग गावित,योगेश महाले,संजय पडेर,देविदास पाडवी,शांताराम जाधव,दुर्वादास गायकवाड,रतन चौधरी,तुळशीदास चव्हाण,शिवराम वळवी,नामदेव पाडवी,शांताराम महाले,जयप्रकाश महाले,संतोष खुरकुटे,हंसराज भोये,संकेत देनक, शुधांशु धारणे,रुपल गुजराथी, नारायण गभाले, प्रविण चौधरी, देविदास कामडी व भाटी, खिर्डी, भेनशेत, बेडसे, आमदा बाऱ्हे, ठाणगाव, गुरटेंबी, कळमणे केळावण, चिऱ्याचापाडा, चिंचपाडा या ११ गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
    जलथॉन-२०२६ हा उपक्रम ग्रामीण भागातील जलसाक्षरता, निसर्गसंवर्धन आणि शाश्वत विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, गाव पातळीवर वैज्ञानिक पद्धतीने जलव्यवस्थापन आराखडे तयार करण्याची नवी दिशा या उपक्रमातून मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने