दिंडोरी । प्रतिनिधी :-आज सकाळी 8 वाजेपासून झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे दिंडोरी शहराची अक्षरशः तुंबापुरी झाली. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने संपूर्ण दिंडोरी शहर जलमय झाले होते. या अचानक आलेल्या पाण्यामुळे व्यापारी, नागरिक आणि वाहनधारकांची मोठी तारांबळ उडवली. पावसाच्या तीव्रतेमुळे नाशिक - दिंडोरी - वणी या प्रमुख महामार्गावर पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली.
पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, रस्त्यावरील पाणी थेट मुख्य बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये शिरले. शहरातील पंजाब नॅशनल बँक आणि तिच्या शेजारी असलेल्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठा गोंधळ उडाला. पाणी साचल्यामुळे बँकेतील आणि केंद्रातील महत्त्वाचे कागदपत्रे भिजून खराब झाले, तसेच काही इलेक्ट्रॉनिक वस्तू व साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. यावेळी दिंडोरी नगरपंचायतीच्या कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पावसातही कर्मचार्यांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा निचरा केला आणि पुढील मोठा अनर्थ टाळला. या मुसळधार पावसामुळे दिंडोरी शहरातील धामण नदीला रौद्ररूप प्राप्त झाले. नदीच्या पाण्याचा स्तर क्षणार्धात वाढल्याने गावातील जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. तसेच पालखेड बंधारा रस्त्यावरील पुलावरूनही पुराचे पाणी वाहू लागल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करून दुसर्या मार्गाने वळवण्यात आली. धामण नदीला आलेला पूर आणि पुलावरून कोसळणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह एखाद्या मनमोहक धबधब्यासारखा दिसत होता. हा दृश्य अनुभवण्यासाठी शहरातील स्थानिक नागरिकांसह महामार्गावरून जाणार्या प्रवाशांनी नदीकाठी प्रचंड गर्दी केली होती. अनेक जण पुराच्या पाण्यात धोक्याच्या ठिकाणी जाऊन फोटो आणि व्हिडिओ काढताना दिसून आले. निळवंडी रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या पाण्यातून मार्ग काढतांना वाहनचालकांना तारेवरची करावी लागली. त्यानंतर तीन तासानंतर पावसाने थोड्याफार प्रमाणात विश्राती दिल्याने पाणी कमी झाले परंतू या घाणीचे व चिखलाचे साम्राज्य पसरले होते. दिंडोरी मुख्य बाजारपेठेत पूर्णपणे चिखलमय झाला होता. त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.