नाशिक l प्रतिनिधी :- नाशिक रोड येथे कृषी विभागाच्या कार्यालयाबाहेर राज्य कृषी सहायक संघटनेच्या कृषी सहायकांनी धरणे आंदोलन करीत निषेध नोंदवला. या वेळी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यातून कृषी सहायक सहभागी झाले होते.
कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती देण्यात यावी, कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी करावे, कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असलेले कृषी सहायकांना संगणक मिळावा. कृषी सहायकांना मदतनीस द्यावा, निविष्ठा वाटप संदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यामध्ये सुसूत्रता येत नसून कृषी सहायकांना वाहतूक भाड्यापोटी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे कृषी सहायकांना भाड्याची तरतूद करण्यात यावी. यासह इतर मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
या वेळी नाशिक जिल्हाध्यक्ष हरिभाऊ गावित, विभागीय सचिव नीलेश भदाणे, जय किर्तिमान पाटील, तुळशीदास वळवी, दीपक झाल्टे अशोक राऊत, विजय खैरनार, राहुल शिंदे यांच्यासह कृषी सहायक उपस्थित होते.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे:-
१.कृषिसेवकांना नियमित कृषी सहायक पदावर नियुक्त करणे.
२.कृषी सहायक पदनाम बदलून 'कृषी अधिकारी' असे करणे.
३.डिजिटल कामकाजासाठी लॅपटॉप उपलब्ध करून देणे.
४.कृषी पर्यवेक्षकांची पदसंख्या वाढवावी.
५.पदोन्नतीतील अडथळे दूर करावेत.
"सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असूनही कृषी सहायक गांधीगिरीने आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शासनाने मूलभूत मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा. एवढीच अपेक्षा आहे."
- हरिभाऊ गावित, जिल्हाध्यक्ष
विभागीय कृषी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करताना कृषी सहायक.