दिंडोरी l मनोज पाटील:- दिंडोरी तालुक्यातील कोर्हाटे गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पाझरतलावात अलीकडच्या काळात ठराविक जातीचे मासे मृत आढळल्याने गावकर्यांमध्ये तीव्र चिंता आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. या घटनेमुळे पाणी दूषित झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोका निर्माण झाला आहे.
कोर्हाटे येथील पाझरतलावात वाघाड उजव्या कालव्याचे पाणी सोडले जाते. या पाण्याचा वापर गावकरी पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच जनावरांच्या गरजांसाठी करतात. पाझरतलावाच्या कडेला असलेल्या विहिरींमधून शेतकर्यांना शेतीसाठी पाणी पुरवले जाते. या तलावातील पाणी शेतमजूरही पितात. पाणी वापर पूर्णतः सार्वजनिक आहे. अशा स्थितीत पाण्यात मासे मृत आढळल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती समजताच ग्रामपंचायतीने गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तात्पुरता बंद केला आहे. परिणामी, गेल्या चार दिवसांपासून गावकरी पिण्याच्या पाण्याविना त्रस्त आहेत. तलावाच्या काठावर दुर्गंधी पसरली असून, परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रवीण नाना जाधव यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाकडे त्वरीत पाण्याच्या नमुन्यांची सखोल तपासणी करून मासे मृत होण्यामागील कारणांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. हेच पाणी गावकरी पितात आणि शेतीसाठी वापरतात. मासे का मरत आहेत हे समजले पाहिजे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे जाधव यांनी सांगितले. प्रशासनाने घटनास्थळी भेट देत जलनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामस्थांनी या प्रकरणी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.