महाराष्ट्र ट्रायबल न्युज

भाजपच्या प्रवासाला भावनिक सलाम; नगराध्यक्ष कराटे यांनी घेतले ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. विश्वास देशपांडे यांचे आशीर्वाद

दिंडोरी l प्रतिनिधी:- दिंडोरीच्या राजकीय इतिहासातील एक भावनिक आणि संस्मरणीय क्षण नुकताच अनुभवायला मिळाला. भाजपच्या नगरसेविका आशाताई कराटे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी दिंडोरी तालुक्यात भाजपची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा वयोवृद्ध डॉक्टर विश्वास देशपांडे यांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतले. या भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि डॉ. देशपांडे यांचे डोळे अक्षरशः पाणावले.
एकेकाळी दिंडोरी तालुका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. त्या काळात भाजपचे नाव घेणारेही फार कमी होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत १९८४ च्या दशकात डॉक्टर विश्वास देशपांडे यांनी अथक परिश्रम घेत तालुक्यात भाजपची पायाभरणी केली. विरोध, उपेक्षा आणि संघर्ष यांच्या सावटातही त्यांनी पक्षाची ज्योत अखंड तेवत ठेवली.
आज त्याच भाजपचा नगराध्यक्ष दिंडोरीत विराजमान झाल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. “आपण केलेल्या संघर्षाची दखल पुढच्या पिढीने घेतली,” ही भावना त्यांच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसत होती. आशाताई कराटे यांनी प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यापूर्वी ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेण्याचा घेतलेला निर्णय अनेकांच्या मनाला भिडला.
दिंडोरी नगरपंचायतीत मागील काही वर्षांत भाजपने चार सदस्यांच्या जोरावर खाते उघडले होते. सत्ता स्थापनेच्या वेळी काँग्रेस, तत्कालीन उभाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र पुढील राजकीय घडामोडींमध्ये चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळे, विवेक कुलकर्णी आणि विलास नाना देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून शब्द सोडून घेतला होता.त्यात सर्वच नगर सेवकांनी सहकार्य केले.भाजपला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आणि आशाताई कराटे यांची बिनविरोध निवड झाली.
नगराध्यक्ष झाल्यानंतर आशाताई कराटे यांनी डॉक्टर विश्वास देशपांडे, चंद्रकांत राजे, शिवाजी बाबा पिंगळ, विवेक कुलकर्णी, विलास नाना देशमुख आणि विजय पिंगळे यांचे आशीर्वाद घेत विकासाच्या कामाला प्रारंभ केला.
या भेटीदरम्यान डॉक्टर देशपांडे यांनी भाजपचे नेते सुरेश पाटील, पोपटराव हिरे, देवेंद्र फडणवीस, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय हरिश्चंद्र चव्हाण आणि स्वर्गीय कचरूभाऊ राऊत,आचार्य शर्मा ,जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी ,विजय साने,सुनील केदार ,सुनील बच्चाव ,मंदा पारख यांच्या आठवणींना उजाळा दिला. “दिंडोरीचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच अपेक्षा,” अशा शब्दांत त्यांनी आशाताई कराटे यांना मार्गदर्शन केले.
यावेळी डॉक्टर देशपांडे यांनी शाल व श्रीफळ देऊन आशाताई कराटे यांचा सत्कार केला. चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळ, विलास देशमुख, विवेक कुलकर्णी मंदा पारख, एस सी मोर्चा अध्यक्ष तथा नगर सेवक नितीन गांगुर्डे यांनीही शुभेच्छा देत नव्या नेतृत्वाकडून विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या.
दिंडोरीतील भाजपच्या संघर्षमय प्रवासाचा हा क्षण केवळ राजकीय नव्हता, तर जुन्या पिढीच्या त्यागाला नव्या नेतृत्वाने दिलेला भावनिक सलाम होता.

दिंडोरी नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी आशाताई कराटे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी भाजपचे मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ नेते डॉक्टर विश्वास देशपांडे चंद्रकांत राजे विवेक कुलकर्णी शिवाजी पिंगळ विलास देशमुख यांची भेट घेऊन दिंडोरीच्या विकासासाठी आशीर्वाद घेतले. यावेळी भावनिक वातावरण तयार झाले होते समवेत दिंडोरी मंडल एस सी मोर्चा अध्यक्ष नगरसेवक नितीन गांगुर्डे ,विजय पिंगळे
(छाया:- कृष्णा पवार)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने