महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*यंदा मिरचीच्या दरात वाढ ; गृहिणींचे बजेट कोसळले*

दिंडोरी l प्रतिनिधी:- सध्या उन्हाळी हंगाम सुरु असून शहरासह ग्रामीण भागातील महिला विविध प्रकारचे घरगुती उन्हाळी साहित्य तयार करण्याच्या तयारीत व्यस्त दिसत आहे. त्यात लाल तिखट, पापड, लोणचे, शेवया या साहित्याचा समावेश आहे. त्यातच तिखटाला सर्वाधिक पसंती असते. विविध प्रकारच्या मिरच्या बाजारात दाखल झाल्या असल्या तरी यंदा लाल मिरचीच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोसळल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. 70 ते 80 टक्क्यांनी वाढ यंदाच्या वर्षी झालेली दिसत आहे.
 दररोजच्या जेवणासाठी लागणारा लाल मसाला हा प्रत्येकाच्या घरात लागतोच. प्रत्येकाच्या मसाला बनवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. सुका मसाला, लाल मसाला, घाटी मसाला, गोडा मसाला, आगरी-कोळी मसाला असे या मसाल्याचे प्रकार आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मसाला बनवून घेतात. मात्र ऐन हंगामामध्ये मिरचीचे भाव वाढत असल्यामुळे महिला वर्ग आधीपासूनच मिरची खरेदी करून तिला तीन ते चार वेळा उन्हात वाळवून मग आवश्यकतेनुसार त्यामध्ये गरम मसाला, धणे, बडीशोप आदी पदार्थ एकत्र करून मसाला तयार करून घेतात. मसाल्यांच्या खरेदीला वेग आला असून, तिखट बनवण्यासाठी लागणार्‍या मसाल्यांची आवक बाजारपेठेत झाली आहे. मिरची, मिरची पूड, खडा मसाला या महत्त्वाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. साधारणपणे मार्चमध्ये घराघरात तिखट बनवण्याची घाई सुरू होते. मिरची खरेदीपासून तिखटासाठी लागणार्‍या पदार्थांच्या खरेदीची सुरुवात केली जाते. सध्या ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. गावाला बनविलेल्या मसाल्याने स्वयंपाकाला विशिष्ट चव येते हे माहीत असल्याने हल्ली मुंबईला राहणारे चाकरमानीदेखील गावाला असलेल्या आपल्या नातेवाईकांकडून मसाला बनवून घेतात. त्यामुळे एक महिना आधीपासूनच गृहिणींची मिरची खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे. गतवर्षीपेक्षा चालूवर्षी मिरचीचे दर चांगलेच कडाडल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. प्रामुख्याने तिखट हे उन्हाळ्यातच केले जाते. बेडगी, संकेश्‍वरी, लवंगी, पांडी, काश्मिरी अशा विविध जातीच्या मिरच्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचे दर वाढल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. मिरच्या खरेदी केल्यानंतर त्या कडक उन्हात वाळवणे, देठ तोडणे आणि निवडणे ही कामे अंगणांमध्ये सुरु आहेत. केवळ मिरचीच नव्हे तर मसाल्यात लागणारे इतर साहित्य जसे की धने, जिरे, लवंग, दालचिनी, मिरी आणि दगडफुल यासारख्या खडामसल्यांची खरेदी होत आहे. *चाकरमान्यांचीही पसंती*
विशेष म्हणजे, शहरात राहणारे चाकरमानी देखील आता रेडिमेड मसाल्यांऐवजी गावाकडून मसाला बनवून घेण्याला पसंती देत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात सुट्टीत गावी आलेले अनेक नागरिक जाताना वर्षभराचा घरगुती मसाला सोबत घेऊन जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. *मिरची कांडप यंत्रांवर रांगा*
मिरची कांडप यंत्रांवर रांगाङ्गपूर्वी मसाला हा घरीच खलबत्त्यात कुटला जायचा, मात्र आता त्याची जागा आधुनिक मिरची कांडप यंत्रांनी (मिरचीची गिरणी) घेतली आहे. मसाला दळण्यासाठी सध्या गिरण्यांसमोर गृहिणींच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. प्रत्येक घराण्याची मसाल्याची चव वेगळी असल्याने, आपापल्या आवडीनुसार साहित्य एकत्र करून ते दळून घेतले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने