पालघर l सौरभ कामडी :- पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील कोगदे-चंद्रगाव येथे अवतार कुळ परिवार मेळावा २०२६ उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र, गुजरात तसेच दादरा आणि नगर हवेली येथील अवतार कुळ परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परिवारातील ऐक्य, सामाजिक-सांस्कृतिक जपणूक आणि शैक्षणिक प्रगती हा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मेळाव्याची सुरुवात कुलदेवतेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर कुलदेवतेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करून महिलांनी डोक्यावर गौरी घेत सांबळ नृत्य आणि तारपा नृत्य सादर केले. या मिरवणुकीत महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेली येथील अवतार कुळ परिवारातील सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कोगदे परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. यामध्ये शांताराम घेगड, गणपत भोये, विजय भुसारा, नारायण घेगड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश भोये, सेवा निवृत्त शासकीय अधिकारी श्री. घुटे साहेब तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. परिवारातील सुमारे २८ ते ३० गावांतील सदस्यांसह (पाचशे) ते सातशे (७००) नागरिकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दहावी-बारावी, नीट परीक्षा, नवोदय व एकलव्य शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणारे विद्यार्थी, सरळ सेवा भरतीत निवड झालेले उमेदवार, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला.
परिवारातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत पुढील वाटचालीसाठी विचारमंथन करण्यात आले. आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक सांबळ व तारपा नृत्य यामुळे कार्यक्रमाला पारंपरिक रंग चढला.
मेळाव्याचे अध्यक्षपद सखाराम सोमा अवतार (कापराडा , गुजरात) यांनी भूषविले. सचिवपदी गोविंद रामा अवतार (कोगदे), खजिनदार म्हणून यदुनाथ भिवा अवतार (देवगाव), सहसचिव संतोष बाळू अवतार (आळ्यांचीमेट ) तर उपाध्यक्षपदी राजाराम गोपाळ अवतार, प्रकाश अवतार आणि राघो रामा अवतार यांनी जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यदुनाथ अवतार यांनी केले. सूत्रसंचालन संतोष अवतार यांनी केले असून आभार प्रदर्शन व निरोप समारंभ कैलास अवतार यांनी पार पाडला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.