महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आदिवासी संस्कृतीला नवी ओळख- MTDC च्या पुढाकारातून सांस्कृतिक पर्यटनाला चालना

खोकरविहीर l प्रतिनिधी :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) सहकार्याने पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये आदिवासी संस्कृती व पारंपरिक वारसाला नवसंजीवनी देण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. विशेषतः आदिवासी समाजाच्या ‘अमूर्त पारंपरिक वारसा ’वर (Intangible Heritage) आधारित हे उपक्रम सांस्कृतिक पर्यटनाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
    या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार तालुके तसेच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात वर्षभर कलाकार एकत्र करून कला विकसित करून, कला संवर्धन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळांमध्ये आदिवासी नृत्यप्रकार, पारंपरिक संगीत, वाद्यनिर्मिती, हस्तकला आणि लोकपरंपरांचे जतन यांसारख्या विषयांवर प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच कलाकारांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘मार्केट लिंकजेस’ देखील निर्माण करण्यात येत आहेत.
या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत असून, वारली चित्रकला आणि ‘बोहाडा’ मुखवटा निर्मितीमध्ये निपुण असलेले अनेक कलाकार देशभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, सुरगाणा तालुक्यातील डोल्हारे गावातील ‘वाघ पावरी’ नृत्य सादर करणाऱ्या चार कलाकारांनी नुकताच आयुष्यातील पहिला विमानप्रवास करत दिल्ली गाठली. सुप्रसिद्ध भारतीय छायाचित्रकार व दिवंगत पद्मश्री पुरस्कार विजेते रघु राय यांनी सुरू केलेल्या एका विशेष ‘फोटो सिरीज’ प्रकल्पात सहभागी होण्यासाठी हे कलाकार दिल्ली येथे पोहोचले होते.
गेल्या एप्रिलमध्ये रघु राय यांचे निधन झाले असले तरी, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्यांचे प्रॉडक्शन हाऊस हा प्रकल्प पुढे नेत आहे. रघु राय यांना आदिवासी संस्कृतीबद्दल विशेष आकर्षण होते. विशेषतः सुरगाणा तालुक्यातील ‘वाघ पावरी’ नृत्य आणि स्थानिक कलाकारांविषयी त्यांनी अनेकदा गौरवउद्धगार काढले होते.
      MTDC च्या या उपक्रमांमुळे आदिवासी कलाकारांना नवे व्यासपीठ मिळत असून त्यांच्या कलेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळू लागली आहे. आता कलाकार स्वतःहून विविध भागांत जाऊन आपली कला सादर करत आहेत, तर दुसरीकडे पर्यटकही स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी कलाकारांच्या गावांना भेट देत आहेत.
       पर्यटक आदिवासी नृत्य, संगीत, परंपरा आणि जीवनशैलीचा जवळून अनुभव घेत आहेत. बोहाडा मुखवटे, बांबू हस्तकला, वारली चित्रकला यांसारख्या स्थानिक कलाकृतींना मोठी मागणी वाढत आहे. याशिवाय अस्सल आदिवासी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद आणि पश्चिम घाटातील निसर्गरम्य वातावरण हे पर्यटकांसाठी अतिरिक्त आकर्षण ठरत आहे.
     MTDC च्या माध्यमातून सुरू असलेले हे विकासात्मक उपक्रम सांस्कृतिक जतनासोबतच स्थानिक कलाकारांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना देत असून, ग्रामीण व आदिवासी भागातील पर्यटन विकासासाठी हे एक प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने