खोकरविहिर l प्रतिनिधी :-जन लक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था बाऱ्हे, नाम फाउंडेशन, ए.टी. पवार इंटीग्रेटेड फाउंडेशन कळवण-सुरगाणा तसेच सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आंबुपाडा (बेडसे) येथील आश्रमशाळा मैदानावर १०१ आदिवासी जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात, पारंपरिक आदिवासी संस्कृतीच्या जल्लोषात आणि सामाजिक एकात्मतेच्या वातावरणात संपन्न झाला. तब्बल ४५ वर्षांनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याने संपूर्ण सुरगाणा तालुक्यात या उपक्रमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. २० मे रोजी पारंपरिक पद्धतीने हळद समारंभ पार पडला. हळदीच्या रात्री आदिवासी कलाकारांनी पारंपरिक नृत्य सादर करत उत्साहाचे वातावरण निर्माण केले. दि. २१ मे २०२६ रोजी शुभमुहूर्तावर १०१ जोडप्यांचा विवाह सोहळा पारंपरिक विधींसह संपन्न झाला. पाहुण्यांच्या स्वागतासाठी कलाकारांनी आकर्षक “होडी नृत्य” सादर केले तसेच वधू-वरांची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. आदिवासी वाद्ये, नृत्य, पोशाख आणि सांस्कृतिक वातावरणामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
या विवाह सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे, आमदार नितीन पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये उपयुक्त मुंबई यशवंत मोरे, कैलास जाधव, राजेंद्र क्षिरसागर, श्रीमती मंजुषा सिंग, श्रीमती मनिषा महाशब्दे, अॅड. भास्कर निमसे, जितुभाई पारीख, श्रीमती अमिता शेट्टी, मिलिंद देशमुख, सुरगाणा पीआय मिलिंद पाटील, संजय अरिंगळे, काश्मिरा संखे, अविनाश गोटे, प्रभास जोशी, मुकुंद आढाव, सुनील जाजू, शेखर कांबळे, दिलीप गोविंद, आलोक यादव, प्रविण अस्वले, राजू पाटील, राजू पवार, रमेश चौधरी, अशोकराव ठुबे, योगीराज पवार, परशराम वार्डे, चिंतामण वार्डे, युवराज लोखंडे, विश्वास अलबाड, पुंडलिक पडेर, आनंदा झिरवाळ, यशवंत खवळी, पुंडलिक पाडवी, सूर्यकांत जाधव, सुभाष जाधव, सोमनाथ राठड, दत्तू निकुळे, मनोज देशमुख, पुंडलिक खंबाईत, योगेश वाघमारे, योगेश पाडवी, देविदास धुम, नामदेव पाडवी, नारायण गभाले, संकेत धेनक, नवनाथ गांगोडे, देविदास कामडी, विजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
विवाह सोहळ्यात वधू-वरांसाठी अत्यंत सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक जोडप्याला स्वतंत्र क्रमांक देऊन बैठक व्यवस्था करण्यात आली होती. वधू-वरांसोबत आलेल्या पालक व पाहुण्यांसाठी निवास, पिण्याचे पाणी, भोजन व इतर आवश्यक सुविधांचे उत्तम व्यवस्थापन करण्यात आले. काही वधू-वरांचे पालक हयात नसतानाही त्यांच्या विवाहाची जबाबदारी आयोजकांनी सामाजिक बांधिलकी जपत पार पाडली.
विवाहात नवदाम्पत्यांना भांडी, कपडे, शृंगार साहित्य, कपाट, मंगळसूत्र अशा विविध संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. पेठ, सुरगाणा तसेच गुजरात राज्यातील अनेक वधू-वरांचा या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभाग होता. काही जोडपी उशिरा उपस्थित झाल्यानंतरही आयोजकांनी त्यांचे विवाह लावून सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमासाठी बेडसे, आंबुपाडा, आंबोडे, झगडपाडा, खोकरविहीर, खडकी, केळावण, सरमाळ, ठाणगाव आदी गावांतील तरुण मित्र मंडळे, ग्रामपंचायती, पोलीस पाटील, आश्रमशाळा कर्मचारी, पत्रकार संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. महाराष्ट्र व गुजरात राज्यातूनही मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहिले होते.
कार्यक्रमाचे संयोजक माजी सरपंच संजय पडेर, नामदेव एम. डी. पाडवी, प्रकाश धुम तर आयोजक जन लक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव धुम यांनी संपूर्ण नियोजन यशस्वीपणे पार पाडले. त्यांच्या पुढाकारामुळे हा सामाजिक उपक्रम सुरगाणा तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत असून आदिवासी समाजातील सामाजिक एकात्मता, परंपरा आणि एकोप्याचे सुंदर उदाहरण म्हणून या सोहळ्याकडे पाहिले जात आहे.