खोकरविहिर l प्रतिनिधी:- पेठ तालुक्यातील घोडकीचा घाट कुळवंडी परिसरातून वाहणाऱ्या केर नदीवरील पूल नसल्याने तसेच 3 किमी रस्ता डांबरीकरण अपूर्ण असल्याने परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुळवंडी गाव परिसरात सुमारे 3 किलोमीटरपर्यंत रस्ता डांबरी नसल्यामुळे वाहन चालक व ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे.
कुळवंडी गावाच्या वरच्या बाजूस व घोडकीच्या घाटाच्या खाली केर नदीवर पूल व डांबरी रस्ता नसल्याने तसेच कुळवंडीसह घनशेत, निमोनिपाडा, बरडा, गावंदपळशी, आमलोन, कोहोर, ससूने, कडवईपाडा, पिंपळवटी, घोसाळी, मानकापूर, घोटविहिरा, करंजपाडा , चोळमुख, मानकापूर, डोल्हारमाळ आदी गावांतील ग्रामस्थांना नाशिकला जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील भाजीपाला, शेतीमाल बाजारात नेण्यासाठी शेतकरी तसेच रोजगारासाठी,मजुरीसाठी याच मार्गाचा वापर केला जातो. हा मार्ग नाशिकसाठी जवळचा व सोयीस्कर मानला जातो.
मात्र पावसाळ्यात केर नदीचा प्रवाह चालू झाल्यानंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे नागरिकांना करंजाळी-सावळ घाट किंवा चिंचवड मार्गे वाघेरा घाटातून तब्बल 40 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. सावळघाट किंवा वाघेरा घाटात दरड कोसळणे, रस्ता खचणे सारखी नैसर्गिक समस्या निर्माण झाल्यास पर्यायाने या रस्त्याचा वापर केला जातो कुळवंडी ते नाशिक सिव्हिल हॉस्पिटल फक्त 40 किमी अंतर असताना जास्तचा 40 किमी वळसा घालून 80 किमी प्रवास करावा लागतो विशेषतः रुग्ण, गर्भवती महिला, डिलेव्हरी पेशन्ट तसेच सर्पदंश झालेल्या रुग्णांना तातडीने नाशिक येथे उपचारासाठी नेणे कठीण बनते. त्यामुळे केर नदीवर कुळवंडी गावालगत तातडीने पुलाचे बांधकाम करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
कुळवंडी गावाच्या वरती पूल नसल्यामुळे चार वर्षांपूर्वी रेशमाबाई तुळशीराम भोये या महिला शेतात जात असताना पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतरही अद्याप पूल व डांबरी रस्ता न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
घोडकीचा घाट परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून पावसाळ्यात येथे उंचावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. याच परिसरात दमण नदी व केर नदीचा संगम होत असल्याने पर्यटन विकासाची मोठी क्षमता आहे. या भागाला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रतिक्रिया :
“ कुळवंडी गावातून स्मशान भूमी जाणारा रस्ता व पूल झाल्यास स्थानिक ग्रामस्थांना तसेच कुळवंडी परिसरात केर नदीवर पूल व तिन किलोमीटर डांबरी रस्ता नसल्याने परिसरातील नागरिकांना व वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. रस्ता डांबरीकरण व पूल झाल्यास स्थानिकांसह परिसरातील अनेक गावांचा प्रश्न सुटेल.” — सरपंच सुनंदाताई हेमराज सहारे, कुळवंडी