दिंडोरी l प्रतिनिधी:- जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, वनारे येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला.
प्रवेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या शाळा पूर्वतयारी मेळाव्याद्वारे पालक व विद्यार्थ्यांना शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. नवागत विद्यार्थ्यांना शालेय वातावरणाशी परिचित करून देत त्यांच्या शिक्षण प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.मा. श्री.नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच दिपकभाऊ झिरवाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदासभाऊ झिरवाळ, उपाध्यक्ष दिलीप सदू झिरवाळ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश गवळी, प्रमुख अशोकभाऊ झिरवाळ,हरीषभाऊ चौधरी तसेच ग्रामस्थ, पालक व महिला भगिनी, इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांचे विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने जल्लोषात स्वागत केले. शाळेचा परिसर फुगे, तोरणे व आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फुलांच्या पायघड्यांमधून स्वागत करण्यात आले. त्यांच्या पावलांचे ठसे घेऊन शिक्षणाच्या नव्या प्रवासाची आनंदमय सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, गाणी व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप करण्यात आले. तसेच प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना पोषण आहारासोबत स्वादिष्ट जिलेबीचे भोजन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप चौधरी, शिक्षक श्री. दिनेश सहारे, श्रीमती गिता गावित, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य, माजी विद्यार्थी संघ तसेच पालकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या भोजन व पोषण आहार व्यवस्थेसाठी मोहना आई, संगीता अहिरे यांनी मोलाचे योगदान दिले.
शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. नवागत विद्यार्थ्यांच्या आनंददायी स्वागतामुळे शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्याचा आणि शाळेकडे आकर्षित करण्याचा उद्देश या उपक्रमातून यशस्वीरीत्या साध्य झाला.