पालघर l सौरभ कामडी:-दिगंत स्वराज फाउंडेशनच्या वतीने मोखाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये हॉलीबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यातील क्रीडा कौशल्याला चालना मिळावी या उद्देशाने गेल्या वर्षभरापासून विविध गावपाड्यांमध्ये हॉलीबॉल प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये काकडपाडा, कोळध्याचापाडा, वखारीचापाडा, पोशेरा आणि पवारपाडा येथील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षणाचा परिपाक म्हणून आयोजित करण्यात आलेल्या स्वराज हॉलीबॉल लीग 2026 चे सेमी फायनल व अंतिम सामने दिनांक 17 जून 2026 रोजी सीनियर कॉलेज, मोखाडा यांच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले. स्पर्धेत मुलांच्या संघांसोबतच मुलींच्या दोन संघांनीही सहभाग घेतला. काकडपाडा मुली संघ आणि वखारीचापाडा मुली संघ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचे उद्घाटन सीनियर कॉलेज मोखाडा येथील प्राध्यापक दत्तात्रय भोये, दैनिक पुढारीचे पत्रकार हनीफभाई शेख तसेच पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठी क्षमता असून योग्य संधी व प्रशिक्षण मिळाल्यास ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात कोळध्याचापाडा संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर नाव कोरले, तर काकडपाडा संघाने द्वितीय क्रमांक मिळवून उपविजेतेपद संपादन केले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, शिस्त आणि सांघिक खेळ प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
समारोप कार्यक्रमात दिगंत स्वराज फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा शृंगारपुरे, दानिश शेख तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व विजेते आणि सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र, मेडल आणि चषक प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
ग्रामीण भागातील युवक-युवतींना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा दिगंत स्वराज फाउंडेशनचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, या स्पर्धेमुळे तालुक्यातील अनेक नवोदित खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. स्वराज हॉलीबॉल लीगच्या यशस्वी आयोजनामुळे मोखाडा तालुक्यात क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.