महाराष्ट्र ट्रायबल न्युज

नाशिक जिल्ह्यात ७ जुलै रोजी रेड अलर्ट; सहा तालुक्यांतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, धबधबे व पर्यटनस्थळांवर बंदी

खोकरविहीर l प्रतिनिधी :-दि. ६ जुलै : भारतीय हवामान विभागाने ७ जुलै २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करून अतिवृष्टी, ढगफुटीसदृश परिस्थिती, विजांचा कडकडाट, पूरस्थिती व भूस्खलनाचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी तातडीचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
    या आदेशानुसार त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, सुरगाणा आणि नाशिक ग्रामीण या तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, आश्रमशाळा, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना ७ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आवश्यकतेनुसार उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
    नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शाळांबाबतचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार महानगरपालिका घेणार आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले असून नदी, नाले, धरणे, तलाव, पूरप्रवण भाग, घाट, डोंगर उतार व भूस्खलन संभाव्य ठिकाणी जाणे टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
    तसेच त्र्यंबकेश्वर, वणी (सप्तशृंगी) आणि जिल्ह्यातील सर्व धबधबे, ट्रेकिंग पॉईंट्स, पर्यटनस्थळे, नदीकाठ व पूरप्रवण धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहेत. संबंधित विभागांना बॅरिकेडिंग करून प्रवेश रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
    जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जत्रा, मेळावे व मोठ्या सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहेत. पूरप्रवण व भूस्खलनग्रस्त भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, निवारा केंद्रांची व्यवस्था, अन्न, पिण्याचे पाणी, औषधे तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
    SDRF, NDRF, अग्निशमन दल, होमगार्ड, आपदा मित्र व स्थानिक बचाव पथकांना सतर्क ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून JCB, बोटी, जनरेटर, लाईफ जॅकेट्स व इतर बचाव साहित्य सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
      जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ भारतीय हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने