महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अवनखेड गावचे विकास मॉडेल देशभर पोहोचवणार – राज्यपाल आचार्य देवव्रत

अवनखेड l प्रतिनिधी :-महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम आचार्य देवव्रत हे दिंडोरी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना अवनखेड गावचे सरपंच नरेंद्र जाधव व ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत नियोजित कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी अवनखेड गावास सदिच्छा भेट दिली.
         यावेळी अवनखेडचेसरपंच नरेंद्र जाधव यांनी ग्रामस्थांच्या वतीने राज्यपाल देवव्रत यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
         यावेळी सरपंच नरेंद्र जाधव यांनी अवनखेड गावाचा पूर्व इतिहास तसेच गेल्या २० वर्षांत झालेल्या सर्वांगीण विकासाची सविस्तर माहिती महामहीम राज्यपालांना दिली. २००५ पूर्वीची गावाची परिस्थिती आणि त्यानंतर शासकीय योजनांचा योग्य व नियोजनबद्ध वापर करून झालेला अमूलाग्र बदल याबाबत माहिती सादर करण्यात आली.
          गावातील पाणीपुरवठा योजना, अद्ययावत प्रशासकीय इमारती, सर्व सोयीसुविधांनी युक्त प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, बौद्ध विहार, अमरधाम, घंटागाडी सेवा, शालेय बस, वैकुंठरथ, काँक्रीट रस्ते, सभामंडप, शेततळे तसेच औद्योगिक वसाहतीमधून बेरोजगार तरुणांना उपलब्ध करून दिलेला रोजगार यांची माहिती P.P.T. सादरीकरणाद्वारे महामहीम राज्यपालांना देण्यात आली.
         अवनखेड गावाचा आश्वासक व सर्वांगीण विकास पाहून महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले,
“सरपंच व ग्रामस्थांच्या सहकार्याने शासकीय योजनांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करून गावाचा झालेला विकास पाहून मी प्रभावित झालो आहे. अवनखेड गावाचे हे विकास मॉडेल मी नक्कीच देशभर पोहोचवेन, जेणेकरून इतर ग्रामपंचायतींनाही याचा आदर्श घेता येईल. अवनखेड ग्रामपंचायतीला भेट देऊन मला अत्यंत आनंद झाला.”
     या कार्यक्रमास सरपंच नरेंद्र जाधव यांच्यासह ग्रामस्थ, तसेच प्रशासकीय उच्चपदस्थ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने