महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पेसा अध्यक्ष यशोधन देशमुख यांच्या पुढाकारातून करंजाळी शाळेचा कायापालट; शैक्षणिक सुविधांमध्ये मोठी भर

अलंगुण l कृष्णा पवार:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाळी येथे पेसा अध्यक्ष श्री. यशोधन देशमुख यांच्या पुढाकारातून शाळेचा सर्वांगीण विकास साधण्यात आला असून विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्याने शाळेचे रूपडेच पालटले आहे.
     ग्रामपंचायत सदस्य श्री. हेमंत महाले, सौ. रोहिणी राऊत, ग्रामस्थ तसेच शाळेतील शिक्षक यांच्या संयुक्त विचारमंथनातून शाळेसाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पेसा अध्यक्ष श्री. यशोधन देशमुख यांनी विशेष प्रयत्न करून शाळेची दुरुस्ती व रंगरंगोटी केली. तसेच शाळा परिसराला सुरक्षिततेसाठी तार कुंपण उभारण्यात आले.
     विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने दोन एलईडी संच, संपूर्ण लाईट फिटिंग, आठ पंखे तसेच परिपाठ व विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी ध्वनिक्षेपक (स्पीकर) उपलब्ध करून देण्यात आले. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या, सुसज्ज आणि आनंददायी वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
     शाळेच्या विकासासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सुरगाणा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. धनराज भोये यांनी शाळेला भेट देऊन पेसा अध्यक्ष श्री. यशोधन देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी देशमुख यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भरत पवार, उपशिक्षक श्री. अविनाश धुम, शिक्षणप्रेमी श्री. लक्ष्मण मोरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    पेसा अध्यक्षांच्या या उपक्रमामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने