संगमनेर l प्रतिनिधी :-क्रिकेटचा देव मानल्या गेलेल्या सचिन तेंडुलकरचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. कोणी अंगावर सचिनचे नाव कोरतो, तर कोणी प्रत्येक सामन्याला स्टेडियममध्ये हजेरी लावतो. मात्र, महाराष्ट्रातील सुधीर दरेकर या निस्सीम चाहत्याने सचिनवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी एक अनोखा आणि ऐतिहासिक मार्ग निवडला आहे. सुधिर दरेकर यांनी गेल्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधील सचिन तेंडुलकर यांच्या फोटोंचे तब्बल १ लाखांपेक्षा जास्त कात्रण (Paper Cuttings) गोळा करून एक थक्क करणारा विक्रम रचला आहे.
सुधीर दरेकर यांनी गोळा केलेला हा संग्रह म्हणजे केवळ फोटोंचा ढीग नसून, सचिन तेंडुलकर यांच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा जिवंत इतिहास आहे. यामध्ये सचिनचे बालपण, त्याचे शालेय क्रिकेटमधील विक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण, ऐतिहासिक शतके, विश्वचषक विजयाचे क्षण आणि क्रिकेटमधून निवृत्ती घेतानाचा भावूक क्षण अशा प्रत्येक टप्प्यावरील फोटोंचा समावेश आहे. वेगवेगळ्या भाषांमधील स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रे आणि मासिकांमधून हे फोटो अत्यंत काळजीपूर्वक कापून फाईल करून ठेवण्यात आले आहेत.
या अनोख्या छंदाबद्दल बोलताना सुधीर दरेकर यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, "हा संग्रह तयार करणे सोपे नव्हते. दररोज सकाळी वर्तमानपत्रे आल्यानंतर त्यातील सचिनचा प्रत्येक लहान-मोठा फोटो शोधणे, तो कातरणे आणि खराब होणार नाही अशा पद्धतीने जतन करणे हा सुधीर दरेकर यांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनला आहे."
सचिन तेंडुलकरचे मैदानातील कडक कव्हर ड्राईव्ह, त्याचे वेगवेगळ्या भावनांमधील चेहरे आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची बातमी या संग्रहात पाहायला मिळते. सुधीर दरेकर यांच्या या अफाट कष्ट आणि निष्ठेचे कौतुक आता क्रीडा जगतातून आणि माध्यम वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर होत आहे. हा १ लाख फोटोंचा अद्भूत खजिना पाहण्यासाठी अनेक क्रीडाप्रेमी उत्सुकता दर्शवत असून, हा संग्रह लवकरच एका जागतिक विक्रमाच्या नोंद पुस्तिकेत स्थान मिळवेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
------------------------------