सुरगाणा | प्रतिनिधी :- सुरगाणा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, माणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आरोग्य केंद्राच्या आवारासह डॉक्टरांच्या शासकीय निवासस्थानांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
साचलेल्या पाण्यामुळे रुग्ण, गर्भवती महिला, त्यांचे नातेवाईक तसेच आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत आहे. डॉक्टरांच्या निवासस्थानांमध्ये पाणी घुसल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, जीवनावश्यक साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
याशिवाय, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चारही बाजूंची सुरक्षा भिंत अनेक ठिकाणी कोसळली आहे. मागील तीन वर्षांपासून सौर ऊर्जा प्रणाली बंद अवस्थेत असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पाण्याचा निचरा करून आरोग्य केंद्र परिसर सुरक्षित करावा, जीर्ण झालेल्या इमारतीचे पुनर्मूल्यांकन करून सर्व आधुनिक व आवश्यक सुविधांसह नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे, तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
सुरगाणा तालुक्यातील अनेक भागांत अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.