महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा पाणी टंचाईमुक्त

💧 _जागतिक जलदिन विशेष_ 💧
बाऱ्हे वार्ताहर - (ता.२२)
जागतिक जलदिनाचे औचित्य साधत सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा या गावच्या पाणी प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले. नाशिकच्या सोशल नेटवर्किंग फोरम आणि अमेरिकेतील ॲडवान्स्ड एन्झाइम्स या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून ही योजना साकारली गेली आहे. प्रकल्पाचे देणगीदार आणि निमाचे उपाध्यक्ष श्री. किशोर राठी, जीवन सोनवणे आणि एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते हा प्रकल्प गावकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख इंजि. प्रशांत बच्छाव, सरपंच अनिता पवार, समन्वयक रामदास शिंदे, विजय भरसट, डॉ. निलेश पाटील, जयदीप गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.  

रोकडपाडा गावासाठी हा एक ऐतिहासिक दिवस ठरला असून, आता गावकरी पाण्यासाठी वणवण भटकण्याच्या समस्येतून कायमचे मुक्त झाले आहेत. या आनंदोत्सवात गावकऱ्यांनी भरभरून सहभाग घेतला. गावातून जलमिरवणूक काढण्यात आली आणि पारंपरिक वाद्यांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमास ग्रामस्थ, शिक्षक, एसएनएफ पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रमोद गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन विजय भरसट यांनी तर आभार प्रदर्शन ऊत्तम वाघमारे यांनी केले. या योजनेसाठी सरपंच अनिता पवार, गोविंद पवार, राजू पवार, ग्रामसेवक मुरलीधर धूम, चंदू चौधरी, मंजुळाताई कडाळे, उत्तम पवार, नीलम गावित, देवाजी चौधरी, तुळशीराम वाघमारे, काशीराम गवळी, अक्काबाई कडाळे, खांडवी मॅडम, सीताराम खांडवी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

*प्रतिक्रिया* 
आदिवासी गावांना पाणी आणि वाचनालये उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सीएसआरच्या माध्यमातून दरवर्षी एसएनएफला मदत करणार आहोत. 
- किशीर राठी, उपाध्यक्ष, निमा  

*असा पूर्ण झाला रोकडापाडा पाणी प्रकल्प
यंदा उन्हाळ्यात लोकांचे हाल सुरू होण्याआधी शक्य तितक्या गावांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी, असा संकल्प एसएनएफने केला होता. या दिशेने काम करताना एसएनएफने सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा गावची पाणी समस्या उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच सोडवली आहे. दिड किलोमीटर अंतरावरील दरीत खोदलेल्या विहिरीतून गावात पाणी आणले आणि टाकी बांधून त्यातून गावकऱ्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचले. गेल्या दहा वर्षांत सोशल नेटवर्किंग फोरम (एसएनएफ) ने ३१ गावांचा पाणीप्रश्न सोडवत आता या शृंखलेत सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा हे ३२ वे गाव ठरले. 
*योजनेसाठी महत्त्वाचे योगदान*
या योजनेसाठी अमेरिका आणि भारतात कार्यरत असलेल्या ॲडवान्स्ड एन्झाइम्स कंपनीचे संचालक वसंत आणि किशोर राठी यांनी सीएसआर निधी उपलब्ध करून दिला. ॲडवान्स्ड एन्झाइम्स ही कंपनी समाजोपयोगी कार्यांसाठी नेहमी पुढाकार घेत असते. याआधीही त्यांच्या सहकार्याने एका गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यात आला आहे. तसेच रोकडपाडा ग्रामपंचायतीने श्रमदान व सहकार्य करत योजनेच्या यशस्वितेस हातभार लावला. यासोबतच एसएनएफच्या तांत्रिक चमूने योग्य नियोजन आणि तांत्रिक ज्ञानाचा वापर करून ही योजना यशस्वी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने