महाराष्ट्र ट्रायबल न्युज

खोडाळा परिसरातील ५० आशा कार्यकर्त्यांनी अनुभवला ‘आशा’ चित्रपटाचा प्रेरणादायी प्रवास

पालघर l सौरभ कामडी :- खोडाळा (ता. मोखाडा) — खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यरत असलेल्या तब्बल ५० आशा कार्यकर्त्यांनी नुकताच ‘आशा’ या प्रेरणादायी चित्रपटाचा विशेष प्रेक्षणानुभव घेतला. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या आशा कार्यकर्त्यांच्या कार्यावर आधारित असलेल्या या चित्रपटामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
     'आशा' हा 'सैराट गर्ल' अभिनित चित्रपट असून यामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील एका आशा कार्यकर्तींच्या जमीनीवरील कार्यावर आधारित आहे, ज्यात त्या कशा प्रकारे घरोघरी जाऊन कुटुंबांची माहिती देतात, आरोग्य सेवा पुरवतात आणि त्यांना येणाऱ्या भावनिक आणि सामाजिक अडचणींवर मात करतात हे दाखवले आहे.हा चित्रपट ग्रामीण भागातील आशा सेविकांच्या जीवनातील संघर्ष, सामाजिक आव्हानं आणि त्यांच्या कार्यावर आधारित आहे, ज्यामुळे या आशा कार्यकर्तींना तो आपलाच चित्रपट वाटत आहे
     या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या महिला अध्यक्षा सविता वाघ यांनी केले होते. आशा कार्यकर्तेंसह इतरही जवळपास ८० महिलांनी या चित्रपटाचा अनुभव घेत आशा कार्यकर्त्यांच्या कामाचे कौंतुक केले. चित्रपटात आशा कार्यकर्त्यांच्या दैनंदिन संघर्ष, जबाबदाऱ्या, सामाजिक अडचणी तसेच त्यांच्या कामातून समाजात घडणारे सकारात्मक बदल प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी चित्रपटातील प्रसंगांशी आपली स्वतःची जीवनकथा जोडली गेल्याची भावना व्यक्त केली.
    कार्यक्रमाच्या शेवटी आशा कार्यकर्त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी नमूद केले. ‘आशा’ चित्रपटाचा हा प्रवास केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, आशा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा आणि उत्साह वाढविण्याचा मैलाचा दगड ठरेल.
 
प्रतिक्रिया...
    मी पहिल्यांदाच सविताताईंमुळे चित्रपटगृहात चित्रपट बघायला आली. आशा चित्रपटामध्ये आमच रोजच जीवन दाखवले आहे. आपल्या कामाचे असे वास्तव चित्रण प्रथमच पाहायला मिळाले. यामुळे आम्ही करत असलेल्या कामाची जाणीव लक्षात येईल. तसेच आरोग्य सेवेत काम करताना येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास हा चित्रपट नवी ऊर्जा देणारा ठरेल.
- अरुणा भरत बुधर, आशा सेविका कुर्लोद.

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा कार्यकर्त्यांचा सन्मान आणि प्रेरणा वाढवणारा हा चित्रपट असून आशा सेविकांच्या जीवनातील संघर्ष, सामाजिक आव्हानं आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकतो. त्यामुळे मोठ्या पडद्यावर आपलेच जीवन अनुभवल्याचे आशा ताईंना वाटल्याशिवाय राहत नाही.
- सविता वाघ, महिला अध्यक्षा, आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने