पालघर l सौरभ कामडी :-दि. २७ : जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देहरे येथे भक्तीवेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या चैतन्य आरोग्य प्रकल्पांतर्गत ‘सर्वांसाठी आरोग्य सहाय्य : आदिवासी भागात व्यापक आरोग्य सेवा’ या उपक्रमाअंतर्गत मेगा मेडिकल हेल्थ कॅम्पचे आयोजन करण्यात आले. दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना तज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात जनरल मेडिसिन, स्त्रीरोग, अस्थिरोग, युरॉलॉजी आणि बालरोग तज्ञांनी एकूण १७९ रुग्णांची तपासणी केली. आवश्यकतेनुसार रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. पुढील उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना भक्तीवेदांत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रेफर करण्यात आले.
याशिवाय, डोळ्यांची मोफत तपासणीही करण्यात आली. तपासणीत मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांवर भक्तीवेदांत हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या आरोग्य शिबिरासाठी देहरे ग्रामपंचायतीचे श्री सरपंच जितेश हरिश्चंद्र भोये यांचे सहकार्य लाभले. ते शिबिरादरम्यान उपस्थित होते. तसेच देहरे येथील उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी थोरात आणि आशा सेविकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना तज्ञ आरोग्य सेवा त्यांच्या गावात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.