दिंडोरी । प्रतिनिधी :-गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलींसोबत गैरव्यवहार होण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने यावर कडक अंकुश ठेवावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेचे अध्यक्ष नितीन बोढारे यांनी केली आहे.
पालकांनी आपल्या मुलांची योग्य काळजी घेतल्यास त्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता येईल. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ आवश्यक कामासाठीच आणि मर्यादित स्वरूपात करावा. जर एखादा विद्यार्थी शाळेत किंवा खासगी क्लासेसमध्ये गैरहजर असेल, तर त्याची माहिती तत्काळ पालकांना मिळणे अनिवार्य आहे. क्लासेसनी त्यांच्या वेळा पालकांना स्पष्टपणे कळवाव्यात आणि विद्यार्थ्यांना परिसरात विनाकारण थांबून देऊ नये. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. शासनाने याची दखल घेऊन सर्व संस्थांना कॅमेरे बसवण्याचे आदेश द्यावेत, शाळा आणि महाविद्यालये सुटण्याच्या वेळी पोलीस प्रशासनाने बस स्थानक आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात नियमित फेरफटका मारावा, जेणेकरून टवाळखोरांवर प्रशासनाचा वचक बसेल, असे नितीन बोढारे यांनी सांगितले.