महाराष्ट्र ट्रायबल न्युज

व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाचा पाया योग आहे - प्राचार्य डॉ. प्रतिमा वाघ

दिंडोरी l प्रतिनिधी :- म.वि.प्र. समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी येथे २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात तीन वेळा ॐकार उच्चारण व प्रार्थनेने करण्यात आली.
   प्रार्थनेनंतर शिथिलीकरणाचे विविध अभ्यास घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, “व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचा पाया योग आहे. त्यामुळे आपले आरोग्य ही आपली जबाबदारी असून प्रत्येकाने नियमित योग व प्राणायाम करून शैक्षणिक तसेच वैयक्तिक प्रगती साधावी.”
    यावेळी डॉ. आर. आर. चव्हाण यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून त्यांचे आरोग्यदायी फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
   कार्यक्रमात ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, अर्धउष्ट्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मकरासन, सेतूबंधासन, पवनमुक्तासन आणि शवासन या योगासनांचा सराव करण्यात आला. तसेच कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी या प्राणायाम प्रकारांचेही प्रात्यक्षिक घेण्यात आले.
   यानंतर सर्व विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व उपस्थित मान्यवरांनी ध्यानमुद्रेत बसून शांतीपाठ केला व निरोगी जीवनाचा संकल्प केला. ॐकार व प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली.
   कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपप्राचार्य प्रा. आर. आर. झोमन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने