कळवण l प्रतिनिधी :-दि. २५ जून – शासकीय माध्यमिक आश्रम शाळा काठरे दिगर येथे आज बाल मैत्रीपूर्ण आश्रमशाळा कार्यक्रमांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या बाल संरक्षण केंद्रबिंदू व्यक्ती (CP Focal Person) यांचे एकदिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणून मास्टर ट्रेनर श्रीमती ज्योत्स्ना मेहेकरे व श्री रवी राजनहिरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संपूर्ण कळवण प्रकल्प टीम उपस्थित होती.
प्रशिक्षणास प्रकल्पातील ४० शाळांमधील ७४ शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रभावी बाल संरक्षण प्रणाली विकसित करणे, बालकांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच सुरक्षित, संवेदनशील व बालस्नेही वातावरण निर्मितीसाठी केंद्रबिंदू व्यक्तींची क्षमता वाढविणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
प्रशिक्षणादरम्यान संयुक्त राष्ट्र बालहक्क संहिता (UNCRC), बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, पोक्सो कायदा २०१२, बाल संरक्षणाची मूलभूत तत्त्वे तसेच बालकांवरील अत्याचार, दुर्लक्ष, शोषण व हिंसा ओळखण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच CP Focal Person यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या, तक्रार निवारण प्रक्रिया, गोपनीयता राखण्याचे महत्त्व, जोखीमग्रस्त मुलांची ओळख व पाठपुरावा यांसह शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम बाल संरक्षण समिती व इतर स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधण्याबाबत चर्चा करण्यात आली.
प्रशिक्षणामध्ये सहभागी शिक्षकांनी विविध विषयांवर अनुभवांची देवाणघेवाण करत सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमित जनजागृती सत्रांचे आयोजन, बाल सहभाग वाढविणे, बाल समित्यांचे सक्षमीकरण तसेच बाल संरक्षण विषयक नोंदी व अहवाल व्यवस्थित ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला.
या प्रशिक्षणामुळे बाल संरक्षण विषयक समज अधिक दृढ झाली असून आश्रमशाळांमध्ये प्रभावी बाल संरक्षण प्रणाली उभारण्यासाठी आवश्यक दिशा व कृती आराखडा निश्चित करण्यात मदत झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.