नाशिक l प्रतिनिधी:- त्यागमूर्ती फाउंडेशनचा तृतीय वर्धापन दिन स्थलांतरित कुटुंब आडगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच कपडे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री. विशाल खांडेकर यांनी केले. त्यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले.
प्रमुख पाहुणे श्री. नितीन देशमुख यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत जांभूळ, आंबा व इतर फळझाडांची लागवड आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. झाडांमुळे वातावरण शुद्ध राहते, आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो. तसेच फळझाडांमधून आर्थिक उत्पन्नही मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे जतन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. मनोज राऊत यांनी जातिव्यवस्थेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाच्या समस्यांवर मार्गदर्शन केले. तरुणांनी महापुरुषांचे विचार वाचनातून समजून घेऊन सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुभाव जपावा, असे आवाहन केले. यानंतर त्यांनी सामाजिक प्रबोधनपर गीत सादर केले. कार्यक्रम प्रसंगी श्री. नितीन देशमुख ,श्री.रवींद्र जगदाळे श्री. संकेत धेनक,श्रीम. रेणुका शिरके, श्री.विशाल खांडेकर,श्री.प्रशिक हिरे,श्री. अविनाश चौधरी,श्री.मनोज राऊत,श्री.सचिन आसम,श्री.राजेंद्र मैराळे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. सचिन आसम यांनी केले.
त्यागमूर्ती फाउंडेशनचा तृतीय वर्धापन दिनाचा हा उपक्रम समाजोपयोगी, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.