दिंडोरी l प्रतिनिधी :- दिंडोरी येथील श्री ईशान्येश्वर विद्यानिकेतन स्कूल व ज्युपिटर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सण अतिशय भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सुंदर दर्शन घडवण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान करून हातात टाळ-मृदंग आणि तुळशीची तुळशीवृंदावने घेऊन दिंडी सोहळा काढला. "विठ्ठल रुक्मिणी" च्या गजराने आणि अभंगांच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या प्रसंगी शिक्षिका दीक्षा मोरे आणि अंचल तिवारी यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या भक्तिमय सोहळ्याला अनुसया मानभाव यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकरी परंपरेचे संस्कार विद्यार्थ्यांवर रुजावेत या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.