महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पुरामुळे वाकी उतारावरील फरशी पाण्याखाली- आंबूपाडा येथे कायमस्वरूपी मोठ्या पुलाची ग्रामस्थांची तीव्र मागणी

खोकरविहीर l प्रतिनिधी:-सुरगाणा तालुक्यातील आंबूपाडा (बेडसे) येथील वाकी उतारावरील चोंड फरशी पावसाळ्यात दरवर्षी पुराच्या पाण्याखाली जात असल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. सुमारे ९२८ लोकसंख्या असलेल्या आंबूपाडा गावासह २० ते २५ गावांतील नागरिकांना या मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे येथे कायमस्वरूपी मोठा पूल उभारावा, अशी अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
वाकी नदीला पूर आल्यावर चोंड फरशी पूर्णपणे पाण्याखाली जाते. परिणामी आंबूपाडा, बेडसे, जांभूळपाडा, बाऱ्हे, मोधळपाडा, कोटंबी, पेठ तसेच परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. सर्वाधिक फटका आश्रमशाळा, महाविद्यालय आणि आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो. विद्यार्थ्यांना शाळा- कॉलेज गाठणे धोकादायक बनते.
याच मार्गावर आंबूपाडा येथील ग्रामीण रुग्णालय असल्याने रुग्ण, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन सेवांनाही मोठा अडथळा निर्माण होतो. पूरस्थितीत रुग्णवाहिका आणि इतर वाहने अडकून पडण्याचा धोका कायम असतो.
     स्थानिकांच्या माहितीनुसार, वाघनखी परिसरातून उगम पावणारी वाकी नदी बाऱ्हे, गुरटेंबी, सर्कलपाडा, जांभूळपाडा, आंबूपाडा आणि बेडसे गावांच्या परिसरातून वाहत पुढे प्रसिद्ध भिवतास धबधब्यावर कोसळते. त्यामुळे पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने फरशी वाहतुकीसाठी पूर्णपणे अनुपयोगी ठरते.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, फक्त दोन किलोमीटर अंतरावर आश्रमशाळा, महाविद्यालय, आयटीआय आणि ग्रामीण रुग्णालय असूनही पुलाअभावी विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी या ठिकाणी उंच आणि मजबूत पूल उभारणे अत्यावश्यक आहे.
     स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने पाहणी करून मोठ्या पुलाच्या कामास मंजुरी द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, मोठा पूल उभारल्यास २० ते २५ गावांतील हजारो नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना वर्षभर सुरक्षित आणि अखंड वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.पुलाची मागणी करणारे ग्रामस्थ योगीराज वाघमारे, महादू गायकवाड, विलास गावित, सुरेश गांगोडे, विलास भडांगे, सखाराम भोंडवे, यादव जाधव, माधव वाघमारे, कैलास वाघमारे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने