दिंडोरी l प्रतिनिधी: जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया (CSI) संस्थेच्या वतीने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ४९ महिलांसह स्तनदा माता, गर्भवती महिला, किशोरवयीन विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. प्रत्येक नवजात बालकाला जन्मानंतर आईचे दूध मिळावे, स्तनपानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे आणि मातांमध्ये योग्य स्तनपान पद्धतीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी चाइल्ड सर्व्हायव्हल इंडियाचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक वैभव खांडवी व डॉ. सिद्धार्थ गांगुर्डे यांनी आईच्या दुधाचे पोषणमूल्य, जन्मानंतर तात्काळ स्तनपानाचे महत्त्व, स्तनपानाची योग्य पद्धत, स्तनपानाबाबतचे गैरसमज आणि त्यामागील वैज्ञानिक सत्य याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मातांनी बाळाला पहिले सहा महिने केवळ आईचे दूधच द्यावे, असा संदेश दिला.
कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पौष्टिक आहार डिश स्पर्धेत ४९ महिलांनी सहभाग नोंदविला. सहभागी महिलांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या धान्ये, कडधान्ये, भाज्या व इतर पौष्टिक घटकांचा वापर करून विविध सकस पदार्थ सादर केले. स्पर्धेत प्रथम ते पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या महिलांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी फार्मासिस्ट ऋषिकेश गवाडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सीएचओ डॉ. योगेश पाठक, आरोग्य सेविका दिपाली वाटाणे, अंगणवाडी सेविका कल्पना गवारे, आशा सेविका कविता गवारे, प्रमिला गवारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून स्तनपानाचे महत्त्व, मातांचा सकस आहार आणि बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या योग्य पोषणाविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली.