महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ग्रामीण आरोग्याला नवी दिशा : IIHMR-बेंगलोरच्या DCDHO अभ्यासक्रमात द्वारा हेल्थ फायनान्सच्या हेल्थ सखींचे घवघवीत यश

वडूज, सातारा l प्रतिनिधी:- ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या उद्देशाने IIHMR-बेंगलोर (Institute of Health Management Research) यांच्या वतीने द्वारा हेल्थ फायनान्सच्या नीम प्रोजेक्टअंतर्गत कार्यरत हेल्थ सखींसाठी आयोजित करण्यात आलेला डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ अँड डिजिटल हेल्थकेअर ऑपरेशन्स (DCDHO) हा ११ महिन्यांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला.
     या अभ्यासक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत हेल्थ सखींना समुदाय आरोग्य, डिजिटल आरोग्य सेवा, आरोग्य तपासणी, रुग्ण समुपदेशन आणि आरोग्य नोंदी व्यवस्थापन यामध्ये विशेष कौशल्य प्राप्त झाले आहे. नुकत्याच IIHMR-बेंगलोर येथे झालेल्या भव्य पदवीदान समारंभात सर्व यशस्वी हेल्थ सखींना डिप्लोमा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
     या कार्यक्रमाला IIHMR-बेंगलोरचे अध्यक्ष डॉ. एस. डी. गुप्ता, डिजिटल हेल्थ तज्ज्ञ डॉ. नचिकेत मोर, माजी IAS अधिकारी डॉ. सी. एस. केदार, PHFIच्या अध्यक्षा डॉ. शोभा प्रकाश, World Diabetes Foundation चे अध्यक्ष डॉ. अनिल कपूर, IIHMR-बेंगलोरच्या संचालिका डॉ. उषा मंजुनाथ, द्वारा हेल्थ फायनान्सच्या सहसंस्थापक सौ. बिंदू अनंत तसेच IIHMRचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आकाश प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    मान्यवरांनी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेमध्ये हेल्थ सखींचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान, नियमित फॉलो-अप, आरोग्य जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्यावर भर दिला.
या प्रशिक्षणानंतर हेल्थ सखी ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल आरोग्य सेवा, नियमित आरोग्य तपासणी, आरोग्य जनजागृती, योग्य समुपदेशन आणि वेळेवर उपचार मिळवून देण्यासाठी अधिक सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.
या डिप्लोमा अभ्यासक्रमात रेश्मा माने, कीर्ती मसाळ, दीक्षा रणपिसे, रोहिणी साबळे, शाहीन मुलाणी, श्रीदेवी माने, दिपाली खाडेकर, मीनाक्षी खुपसे, मधुश्री पडमळकर, सायली शेंडे आणि मनीषा आटकरी या हेल्थ सखींनी यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल IIHMR-बेंगलोर, द्वारा हेल्थ फायनान्सचे वरिष्ठ अधिकारी, सहकारी तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.
ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशिक्षित हेल्थ सखींचे योगदान भविष्यात अत्यंत मोलाचे ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने