इगतपुरी l विक्रम वारूंगसे :-सर्वतीर्थ टाकेद बु.येथील काशा आईमाता मंदिर परिसरात मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने पत्रकार शांताराम भांगे यांच्या वाहनाच्या काचा फोडून तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पत्रकार शांताराम भांगे यांनी आपले वाहन MH-15 HQ-5014 हे काशा आईमाता मंदिराजवळ पार्क केले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने वाहनाच्या काचा फोडून मोठे नुकसान केले.
ही तोडफोड नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चोरीच्या उद्देशाने हा प्रकार झाला की अन्य कोणत्या कारणातून वाहनाला लक्ष्य करण्यात आले, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.
घटनेचा तपास करताना मंदिर परिसरासह आसपासच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. फुटेजच्या माध्यमातून संशयिताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते.
पत्रकाराच्या वाहनाची अशाप्रकारे तोडफोड होणे ही गंभीर बाब असून, पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन अज्ञात आरोपीचा शोध घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.