महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ग्रामीण पत्रकारांच्या हक्कांसाठी घोटीच्या संमेलनात १६ठराव एकमताने मंजूर!

इगतपुरी l विक्रम वारुंगसे:- दि.१५/११/२०२६ रोजी, ग्रामीण पत्रकारिता ही नेहमीच सत्याची कास धरणारी राहिली आहे. कोरोनाच्या काळात वृत्तपत्र माध्यमाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे बदलत्या काळानुसार वृत्तपत्र क्षेत्रात होत असलेले बदल स्वीकारणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचे आव्हान असले तरी संयम राखून नव्या प्रवाहासोबत राहणे आणि काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक देशदूतचे संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी केले.
     पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य संचलित पत्रकार संरक्षण समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी घोटी (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील जैन भवन सभागृहात राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात राज्यभरातील पत्रकार प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
    सकाळी ११ वाजता पत्रकार महर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संमेलनाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक विनोद पत्रे होते. व्यासपीठावर राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ, राज्य सचिव अनिल चौधरी आणि नाशिक जिल्हाध्यक्ष देवचंद महाले उपस्थित होते.
     या सत्रात दिवंगत ज्येष्ठ पत्रकार भोर गुरुजी यांच्या स्मरणार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दुगाव (ता. नाशिक) ग्रामपंचायतीस, हिरडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील नैसर्गिक शेती करणाऱ्या भगिनींना, स्वच्छतादूत बंटी पगारे यांना, सामाजिक पत्रकारिता पुरस्कार पालघर-जव्हार येथील मनोज कामडी यांना, निसर्ग, पक्षी व जंगल संवर्धनासाठी कार्य करणारे प्रल्हाद पवार (जातेगाव, ता. त्र्यंबकेश्वर) यांना, तर आदिवासी संस्कृती, परंपरा व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल देवचंद महाले यांना सन्मानित करण्यात आले.
    यावेळी 'ग्रामीण पत्रकारांचे उपेक्षित जगणं' या विषयावरील विशेष स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात संस्थापक विनोद पत्रे यांनी शासनस्तरावर परस्पर वशिल्याने नियुक्त केल्या जाणाऱ्या पत्रकार समित्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक पत्रकार संघटना अस्तित्वात असूनही खऱ्या अर्थाने कष्ट करणाऱ्या ग्रामीण पत्रकारांची उपेक्षा अनेक वर्षांपासून कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    दुपारच्या सत्रात 'ग्रामीण पत्रकारांची उपेक्षा' या विषयावर ज्येष्ठ पत्रकार राम खुर्दळ यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. यावेळी ग्रामीण पत्रकारांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, एसटी बस व रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत मिळावी, जिल्हा माहिती कार्यालयात नोंदणीची सुविधा मिळावी, शासननिर्मित पत्रकार समित्यांवरील परस्पर नियुक्त्यांना आळा घालावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
    तसेच ग्रामीण पत्रकारांना 'ग्रामदूत' म्हणून शासनाने मान्यता द्यावी, अधिस्वीकृती पत्रासाठी असलेल्या जाचक अटी व शर्ती शिथिल करून ग्रामीण पत्रकारांना ५० टक्के जागा द्याव्यात, पदवीधर व शिक्षक आमदारांप्रमाणे पत्रकारांचे प्रतिनिधित्व संसद व विधिमंडळात असावे, पत्रकारांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळावे, तसेच पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य विमा आणि मोफत उपचार योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांचे एकूण १९ ठराव हात उंचावून एकमताने मंजूर करण्यात आले.

या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी पुढील महिन्यात संबंधित शासकीय विभागांना निवेदने देण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी आंदोलन छेडण्यात येईल, असे राम खुर्दळ यांनी सांगितले.

या सत्रात कृषी अभ्यासक तथा पत्रकार ज्ञानेश उगले आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी डॉ. संदीप भानुसे उपस्थित होते. पत्रकारांचे अध्यापक ध्रिकांत सोनवणे यांनी ग्रामीण भागातील घोटीसारख्या ठिकाणी राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. ज्ञानेश उगले यांनी कृषी पत्रकारितेतील अनुभव मांडले, तर डॉ. संदीप भानुसे यांनी पर्यावरण प्रबोधन, कौटुंबिक सलोखा आणि नातेसंबंध याविषयी आपले विचार व्यक्त केले.

या संमेलनाच्या संयोजन समितीतील विभागीय प्रमुख माया मुक्ताई, स्थानिक स्वागताध्यक्ष सुनिल डी.पगारे, शिवनाथ घोटकर, कार्याध्यक्ष सुनील वाघ, जिल्हा उपाध्यक्ष भारत चव्हाण, अरुण शिंदे, जितेंद्र साठे, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष पांडुरंग दोंदे, निफाड तालुकाध्यक्ष प्रदीप कापसे, वाल्मिक ठोंबरे, नरहरी रोटे, अश्विनी धुळे, राजेंद्र भांड यांच्यासह विदर्भ, वर्धा, आर्वी, अमरावती, पालघर, जव्हार, सोलापूर, नांदेड, देगलूर, राळेगाव, कळंब आणि राज्यातील विविध भागांतील पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


१\) घोटी येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात कै. पत्रकार सुरेश भोर स्मृती पुरस्काराचे सन्मानार्थी व मार्गदर्शक मान्यवर.

२\) राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात उपस्थित मान्यवर आणि राज्यभरातून आलेले पत्रकार प्रतिनिधी.

३\) 'ग्रामीण पत्रकारांचे उपेक्षित जगणं' या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करताना ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक शैलेंद्र तनपुरे. समवेत संस्थापक विनोद पत्रे व राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने