महाराष्ट्र ट्रायबल न्युज

नांदुरी नाशिक रस्त्याचे चौपदरीकरण तर नांदुरी- हतगड रस्त्याचे मजबुतीकरण होऊन


रस्त्यांचा कायापालट होणार / कळवणचे आमदार नितीन पवार यांची माहिती
कळवण:-। प्रतिनिधी। 
आगामी सिंहस्थ कुंभमेळाव्याच्या निमित्ताने सप्तश्रुंगं गडावर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन नांदुरी - नाशिक या रस्त्याचे चौपदरीकरण व नांदुरी-दळवट-हतगड या गुजरातला जोडणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याच्या कामाचा
अर्थसंकल्प 2025 मध्ये समावेश करण्यात येऊन निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती कळवणचे आमदार नितीन पवार यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कळवण सुरगाणा मतदार संघातील रस्ते कामांचा आगामी सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने अर्थ संकल्पात समावेश करुन निधीची तरतुदीची मागणी आमदार नितीन पवार यांनी केली होती. 

 मुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार पवार यांच्या मागणीची दखल घेऊन नाशिक ते नांदुरी हा मार्ग चौपदरीकरण तर नांदुरी ते दळवट -हतगड रस्त्याचे मजबुतीकरण या दोन्ही कामांचा अर्थसंकल्पात समावेश केल्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने या रस्त्यांचा विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

आमदार पवार यांनी निवेदनात नमूद केले होते की श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड,नांदुरी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असे अर्धशक्तीपीठ असुन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारत देशातून भाविक लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात. नाशिक पासुन नांदुरी पर्यंतचे अंतर 57 कि.मी. इतके असून आगामी सिंहस्थ कुंभमेळाव्याच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढणार आहे.

या मार्गावर मोठ्या संख्येने रहदारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्तश्रृंगी गड हे भाविकांचे श्रध्दास्थान असून महाराष्ट्राचे तसेच खांदेशवासियांची कुलदेवता आहे. यामार्गावर होणारी वाहतूक, रहदारी बघता या मार्गाचे चौपदरीकरण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार नितीन पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.  

 नांदुरी दळवट ते हतगड हा रामा २१ मार्ग सापुतारा मार्गे गुजरात राज्याला जोडणारा महत्वाचा रस्ता असल्याने या मार्गावर देखील सप्तश्रृंगी गडावर सिंहस्थाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येतील. गडावर चैत्रौत्सवात यात्रा भरते. महाराष्ट्रासह गुजरात राज्यातुन भाविक मोठ्या संख्येने सप्तश्रृंगी गडावर दर्शनाला येत असल्याने या मार्गाचे देखिल मजबुतीकरण होणे आवश्यक असल्याचे आमदार पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
_______________________________

प्रतिक्रिया :-
सप्तश्रुंगीदेवीच्या अर्धशक्ती पिठामुळे नांदुरी- नाशिक रस्त्यांची ओळख निर्माण झाली आहे. देवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविकांची राज्याच्या विविध भागातून ये -जा सुरु असते. या रस्त्यावर कायम वर्दळ असते. हतगडमार्ग नांदुरीला येणाऱ्या धार्मिक पर्यटकांची संख्या वाढली आहे.गुजरातला जोडणारे दोन्ही रस्ते असल्यामुळे त्याचे महत्व अधिक आहे वाहनांच्या वाढत्या संख्येत हा रस्ता पुरेसा पडत नाही. नांदुरी -नाशिक रस्ता चौपदरी व नांदुरी- हतगड रस्ता मजबुतीकरण करण गरजेचे आहे.
आमदार नितीन पवार, कळवण - सुरगाणा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने