दिंडोरी । मुख्य संपादक- मनोज पाटील
वाळवण पदार्थ म्हणजे उन्हाळ्यात तयार केले जाणारे ते पदार्थ ज्यामुळे वर्षभर पुरते. वाळवण पदार्थ खराब न होतात किंवा त्यांना बुरशी लागत नाही. वाळवण पदार्थ करण्यासाठी उन्हाळा हाच योग्य कालावधी असतो. उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागातील महिलांची वाळवण पदार्थ बनवण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.
गेल्या एक महिन्यापासून बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले होते. मार्च महिना सुरू होताच व कडक उन्हाळ्याची चाहूल लागतातच ग्रामीण भागातील महिलांची वर्षभर पुरेल असे वाळवण पदार्थ करण्याची लगबग सुरू झाली आहे. या पदार्थांमध्ये वडे, पापड, कुरडई , शेवया, उपवासाचे वेफर्स ,बटाटा, चिवडा, चकल्या यांचा समावेश असतो. वर्षामध्ये येणार्या सणावारांसाठी ही वाळवण पदार्थ उपयोगी ठरतात तर इतर पदार्थ ही उपवासासाठी तयार केली जाते. शहरातील महिला वेळेअभावी रेडिमेट पदार्थ आणून आपले वर्षभराची वेळ मारून नेतात. मात्र ग्रामीण भागातील महिला एकत्र येऊन सकाळपासूनच हे वाळवन पदार्थ बनवण्यासाठी तीन दगडांची चूल, त्याला सरपन, घाटाचे पातेले, घोट्या, लोखंडी सोर्या, तेल, पाणी, बाज, पलंग व त्यावर असणारे गवत उपलब्ध करतात आणि त्यानंतर कुरडया बनवल्या जातात. आजही ग्रामीण भागात ही परंपरा ग्रामीण महिलांनी जपून ठेवले आहे. या बनवलेल्या कुरडया वर्षात येणार्या सणांसाठी इतर वस्तूंप्रमाणे जेवणाच्या ताटात कुरडई मान ठेवून तिचा आस्वाद घेतला जातो.वर्षभरात येणार्या विविध सणावाराप्रसंगी बनवून ठेवलेले हे पदार्थ उपयोगी पडतात. दुपारी किवा सायंकाळी कुरकुरीत पदार्थ म्हणून बाजरीच्या तळलेल्या खारवड्यांसोबत शेंगदाणे व कांदा - चटणीचा स्वाद घेतला जातो. आता उन्हाळा चांगलाच जाणवत असून त्याबरोबरच घरा-घरात हे वाळवणीचे पदार्थ बनविण्यासाठी महिलांची लगबग सुरु आहे. वर्षभर जेवणाच्या ताटात लागणारे चटकदार, कुरकुरीत चविष्ट पदार्थ तयार करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये महिला अग्रेसर असतात. उन्हाळी वाळवण ही वर्षभर टिकणारी गोष्ट असल्यामुळे ग्रामीण भागात सणासुदीला तळणाचा बेत ताटात असतोच. यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक वाढू लागली असून उन्हाळी पदार्थ तयार करण्याचा योग्य वातावरण निर्माण झाले आहे. सध्या ग्रामीण भागात गावागावांत घरांसमोर वर्षभर लागणार्या शेवया, कुरडया, पापड, कारवडी आदी उन्हाळी काम सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील महिलांनी आजही ही परंपरा जपली आहे. एकमेकींच्या मदतीने अंगणात उन्हाच्या आधी ही कामे उरकण्याची लगबग दिसून येत आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात महिलांची कुरडया बनवण्याची लगबग सुरू असल्याचे आवास मिळत आहे.
मसाला, मिरची बनविण्याची लगबग
उन्हाची झळ लागायला सुरुवात झाली की, महिलांकडून वाळवणे, मसाले, मिरची बनवण्याची तयारी सुरू होते. दररोजच्या जेवणासाठी लागणारा लाल मसाला हा प्रत्येकाच्या घरात लागतोच. प्रत्येकाच्या मसाला बनवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. सुका मसाला, लाल मसाला, घाटी मसाला, गोडा मसाला, आगरी-कोळी मसाला असे या मसाल्याचे प्रकार आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मसाला बनवून घेतात. मात्र ऐन हंगामामध्ये मिरचीचे भाव वाढत असल्यामुळे महिला वर्ग आधीपासूनच मिरची खरेदी करून तिला तीन ते चार वेळा उन्हात वाळवून मग आवश्यकतेनुसार त्यामध्ये गरम मसाला, धणे, बडीशोप आदी पदार्थ एकत्र करून मसाला तयार करून घेतात. मसाल्यांच्या खरेदीला वेग आला असून, तिखट बनवण्यासाठी लागणार्या मसाल्यांची आवक बाजारपेठेत झाली आहे. मिरची, मिरची पूड, खडा मसाला या महत्त्वाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. साधारणपणे मार्चमध्ये घराघरात तिखट बनवण्याची घाई सुरू होते. मिरची खरेदीपासून तिखटासाठी लागणार्या पदार्थांच्या खरेदीची सुरुवात केली जाते. सध्या ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. गावाला बनविलेल्या मसाल्याने स्वयंपाकाला विशिष्ट चव येते हे माहीत असल्याने हल्ली मुंबईला राहणारे चाकरमानीदेखील गावाला असलेल्या आपल्या नातेवाईकांकडून मसाला बनवून घेतात. त्यामुळे एक महिना आधीपासूनच गृहिणींची मिरची खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे.