ननाशी |-सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग्रामीण लेखक वामन राऊत यांचे आत्मचरित्र असलेल्या चिराखाणी या पुस्तकाचे प्रकाशन नासिक येथील गणाधीश बॅंकवेट हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
या पुस्तकाचे प्रकाशन अन्न आणि औषध प्रशासनचे विशेष कार्य अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ ,वैशाली प्रकाशन पूणे चे विलास पोतदार,आदिवासी साहित्य आणि संस्कृती अभ्यासक प्रा.डॉ.मधुचंद्र भुसारे,बिरसा मुंडा मेडिकल हब नाशिक चे संस्थापक डॉ.साहेबराव झिरवाळ,सुप्रसिद्ध कवी प्रशांत केंदळे आदिंच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी लेखक वामन राऊत यांनी आदिवासी विकास विभागात शिक्षक म्हणून केलेल्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक करून चिराखाणी या वामन राऊत यांच्या आत्मचरित्रात ग्रामीण आदिवासी भागात काम करणाऱ्या सर्व सामान्य माणसाचे जीवनचरित्र रेखाटलेअसल्याचे सांगितले. तसेच लेखक वामन राऊत यांनी आदिवासी भागात काम करतांना आलेले विविध अनुभव ,अडचणी आणि त्यातून मार्ग काढत विद्यार्थ्यांचा साधलेला सर्वांगीण शैक्षणिक विकास यावर मनोगत व्यक्त केले.तसेच या शैक्षणिक कार्यातूनच आत्मचरित्र लिहून ते प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळून आज हे आत्मचरित्र प्रकाशित झाल्याने मनस्वी समाधान मिळाल्याचे यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ भोये यांनी केले.कार्यक्रमासाठी सोनाली राऊत,प्रतिभा राऊत,छाया राऊत,संजना झिरवाळ,ललित राऊत,प्रशांत राऊत आदिनी विशेष परिश्रम घेतले.