महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कळवण - वाळू माफियांवर कारवाई , पाच जणांना अटक वाळूसह ४० लाख ६८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

कळवण । प्रतिनिधी- तालुक्यातील कळमथे गावाचे शिवारात बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर जिल्हा अधीक्षकांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत वाळूमाफिया विनोद ( उर्फ पिंट्या ) नारायण शिरसाठ सह चार जणांना अटक करीत वाळूसह ४० लाख ६८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. 
                    याबाबत सविस्तर वृत्त असे की, कळवण तालुक्यात गिरणा, पुनंद, बेहडी, पांजरा, मार्कण्डेय, अशा वेगवेगळ्या नद्या व ओहळ नाल्यातून अवैध बेकायदा वाळू उपसा तसेच मुरूम दगड वाहतूक अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरु आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाला गोपनीय माहिती मिळाली होती. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित पोलीस अधिकारी अपराजित अग्निहोत्री यांच्या विशेष पथकाने दि १९ मार्च रात्री १ वाजेच्या सुमारास कळमथे ता. कळवण गावाचे शिवारात गिरणा नदीपात्रात कारवाई करून पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत वाळूसह, एक जेसिबी मशीन, दोन ट्रॅक्टर, एक फॉर्च्युनर गाडी , एक स्कॉर्पिओ, चार मोबाईल फोन असा मुद्देमाल मिळून आला आहे. यात विनोद ( उर्फ पिंट्या ) नारायण शिरसाठ, ओम विनोद शिरसाठ ( दोघे मालक ) रा. कळमथे गावाचे शिवारात , आदित्य शशिकांत आहेर (जेसीबी चालक ) रा. मानूर, सचिन शांताराम माळी,रा. अभोणा, सचिन बाबुलाल कामळस्कर रा. अभोणा (दोघे ट्रॅक्टर चालक ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चौकट - या पूर्वीही कारवाई - विनोद नारायण शिरसाठ यांचेवर मानूर ता. कळवण येथून बेकायदा मुरूम वाहतूक सुरु होती. या प्रकरणी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांचेकडे तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली होती. यात त्यास ८ लाख ४ हजार ९६० रुपयांचा दंड झाला आहे. असे असतांना पुन्हा बेकायदा राजरोस वाळू, मुरूम चोरून वाहतूक सुरूच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने