नाशिकहून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी झाली आहे. ज्या बस आहेत त्या खराब झालेल्या आहेत. ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लासलगाव आगाराची लासलगाव सुरगाणा ही बस (एमएच ४० एन ८८३१) सुरगाणा कडे जात असताना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बोरगाव (ता. सुरगाणा) येथे नादुरुस्त झाली. या बसमध्ये ५५ प्रवाशी होते. प्रवाशांना जवळपास एक तासानंतर दुसऱ्या बसमधून सुरगाणा कडे पाठवण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले.
मागील वर्षी ९ फेब्रुवारी ला नाशिक उंबरठाण हि बस चिराई घाटात बंद पडली होती, १७ मार्चला उंबरठाण नाशिक बस नाशिककडे जात असतानाच बोरगाव येथे ही सव्वाचार वाजता नादुरुस्त झाली. बसमध्ये ६८ प्रवाशी होते. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले हाेते. यासह २१ सप्टेंबरला नाशिक उंबरठाण बस बोरगाव येथे नादुरुस्त झाली होती. १८ नोव्हेंबरला नाशिक करंजूल ही बस बोरगाव येथेच नादुरुस्त झाली होती.
पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागात जाणाऱ्या बसेस चांगल्या दर्जाच्या द्याव्यात अशी मागणी अनेक बस चालकांनी आगार व्यवस्थापकांकडे केलेली आहे. लासलगाव आगारातून सुरगाणा ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची अगोदर तपासणी केल्यानंतरच सोडण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
*चांगल्या बस साेडाव्यात*
सुरगाणा तालुक्यात साेडण्यात येणाऱ्या बस कायमच नादुरूस्त हाेतात. हि बस रस्त्यात ठिकठिकाणी अशी तीन ठिकाणी बंद पडली. यामुळे मी खाजगी कामासाठी जाण्यासाठी विलंब झाला.
अनुश शेख, प्रवासी