बाऱ्हे वार्ताहर - (ता.२५)
सुरगाणा तालुक्यातील शेपुझरी शेजारील कहांडोळपाडा येथील वामन गणपत वार्डे यांच्या घराला काही दिवसांपूर्वी दुपारी अचानक आग लागून घरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंचे व घराचे १०० टक्के नुकसान झाले असुन त्यात धान्ये, कपडे, भांडे, पैसे, सोने, चांदी दागिने इतर वस्तू पूर्णपणे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आजच्या घडीला त्यांना मदतीशिवय पर्याय उरला नाही. एक हात मदतीचा म्हणून बाऱ्हे येथील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी बाऱ्हे येथील आठवडे बाजारात फिरून बाऱ्हे व्यापारी वर्ग, बाजारातील व्यापारी वर्गाकडून फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून १००, २००, ५००, १००० जमा करत घर जळालेल्या नुकसानग्रस्त कुटुंबाला १२ हजार ८३३ रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली.
माजी सरपंच परशराम वार्डे, देविदास गावीत, मनोहर खांबाईत, युवराज जाधव, जगदीश पाडवी, मनोहर जाधव, दिपक जाधव, माणिक वार्डे, केशव सोनवणे, निवृत्ती भिवसन, देविदास सोनवणे, सुनिल जाधव, प्रभाकर पालवी, भास्कर वार्डे, दौलत गुंबाडे आदींनी परिश्रम घेऊन नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत केली आहे.