वणी । वणी-सापुतारा महामार्गावरील करंजखेड फाटा भागात हॉटेलच्या आडून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत तीन पत्यांचा जुगार खेळणाऱ्या सहा जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, करंजखेड फाटा येथे हॉटेल विश्रांतीच्या परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर वणी पोलीस ठाण्याचे सपोनी सुनील पाटील यांनी पथकासह धाड टाकली असता, जालिदर अशोक जोपळे (रा. करंजखेड, ता. दिंडोरी), पारसकुमार धिरजलाल कन्हेरीया (रा. चिखली, जि. नवसारी), हितेश गोपाल भिमानी (रा. अजाब उमियानगर, गुजरात), रवींद्र श्रावण खरे (रा. कोशिंबे, ता. दिंडोरी), भरत रमेश चौरे (रा. पिंपळनारे, ता. चांदवड) आणि रामराव गव्हाणे (रा. आळंदी, ता. खेड) हे जुगार खेळताना आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून १२,६०० रुपये रोख, १ लाख रुपयांचे मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकाराशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.