खोकरविहीर l प्रतिनिधी:-दि. २६/१२/२०२५ कै. अंबादास वाजे सर यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक येथे जिल्हा परिषद शिक्षकांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्र मधून विविध जिल्हा तालुक्यातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला राज्यातील एकूण ३२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन ही स्पर्धा नाशिक येथील MCC स्टेडियम, म्हसरुळ, पंचवटी येथे पार पडली. दिनांक २५ डिसेंबर २०२५ (गुरुवार) रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना गतविजेता
*नाशिक वॉरियर्स व अहिल्यानगर वॉरियर्स* या दोन बलाढ्य संघांमध्ये खेळविण्यात आला. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. दोन्ही संघांनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
अंतिम सामन्यात अहिल्यानगर वॉरियर्स संघाने सर्वच विभागात उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक वॉरियर्स संघावर मात केली व महाविजेतेपदावर आपले नाव कोरले. गतविजेता नाशिक वॉरियर्स संघानेही लढत देत उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत तृतीय क्रमांक कोल्हापूर संघाने, तर चतुर्थ क्रमांक राहुरी रॉयल्स संघाने मिळविला.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक, सन्मानचिन्हे व रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली. खेळाडूंच्या शिस्तबद्ध खेळाचे, संघभावनेचे व क्रीडावृत्तीचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, पदाधिकारी, संयोजक मंडळ, पंच, स्वयंसेवक व शिक्षक बांधवांनी मोलाचे सहकार्य केले. *खेळाबरोबरच शिक्षकांमधील आपुलकी, एकोपा व मैत्रीभाव वृद्धिंगत करण्याचा या स्पर्धेचा उद्देश सफल झाल्याचे आयोजकांनी यावेळी नमूद केले.*
संपूर्ण स्पर्धेचा मागोवा श्री प्रदिप खवले सर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगीतला. स्पर्धेसाठी मेहनत घेतलेल्या सर्व सहका-याचे धन्यवाद दुर्वादास गायकवाड सर यांनी मानले. स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल सर्व प्रायोजक व उपस्थित प्रमुख पाहुणे यांचे आभार नंदु देसले सर यांनी मानले. स्पर्धेचे अध्यक्ष संतोष थोरात सर यांनी पुढील काळात स्पर्धेच्या आयोजनात अधिक सुधारणा व खेळाडुंना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी प्रेषकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली.