महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बदलत्या वातावरणामुळे शेतकरी धास्तावला शेतकर्‍यांची गहू सोंगणीसाठी धावपळ

दिंडोरी । दि. 3 प्रतिनिधी
       दिंडोरी तालुक्यात बदलत्या हवामानामुळे गहू सोंगण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र गहू सोंगणीसाठी वेळेवर योग्य प्रमाणात मजूर मिळत नसल्याने नाइलाजाने हार्वेस्टर मशीनच्या साहाय्याने गहू सोंगणीकडे शेतकर्‍यांचा कल दिसून येत आहे.
       गहू सोंगणीसाठी मजूर मिळत नसल्याने आता शेतकरी यंत्राद्वारे गहू सोंगणी करत आहे. गव्हाचे कमी क्षेत्र असलेल्या काही शेतकरी स्वतः आपल्या शेतात राबून गहू सोंगून मोकळा झाला आहे. रब्बी हंगामातील गव्हाचा उतारा चांगला येत आहे. गव्हाला भाव नसल्याने शेतकरी उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. गव्हाच्या पेरणीसाठी लागणारा खर्च व मेहनत जास्त आहे. गव्हाला 15 दिवसांपूर्वी 3500 रुपये प्रति क्विंटलचा भाव होता. परंतु, आता 3200 ते 3300 रुपये भाव असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. यामुळे एकूणच खर्चाचा विचार करता आर्थिक उत्पन्नात घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मजूर मिळत नसल्याने पंजाब, हरियाणा तसेच जिल्ह्यातही असलेल्या हार्वेस्टर मशिनला मागणी वाढली आहे. एकरी दोन हजार रुपये मोजूनही हार्वेस्टर मशीन मिळत नसल्याने शेतकर्‍यांना नंबर लावावा लागत आहे. मशीन मिळवण्यासाठी रात्रंदिवस शेतकर्‍यांना मशीनच्या मागे फिरण्याची वेळ आली आहे. एका तासात तीन एकरपर्यंत मशिनच्या साहाय्याने सोंगणी केली जाते. दोन दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे शेतकरी गहु काढणीसाठी धावपळ करतांना दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने