दिंडोरी । दि.४ प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी दिंडोरी व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंप्री अंचला येथे ग्राम कृषी विकास समितीचे प्रशिक्षण संपन्न झाले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ग्राम कृषी विकास समिती सदस्य व स्वयंसेवक यांचे प्रकल्प ओळख प्रशिक्षण नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव आमले, कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर तालुका कृषी अधिकारी नाना भोये यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुक्यातील या योजनेत निवड झालेल्या 48 गावांमध्ये दूरदृश्य प्रणाली द्वारे संपन्न झाले. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत पिंपरी अंचला येथे दूरदृश्य प्रणाली द्वारे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रास्ताविक प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी केले. विकास चंद्र रस्तोगी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना क्रमांक दोनचा परिचय प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांनी करून दिला. त्यानंतर सूक्ष्म नियोजन करून गावाचा प्रकल्प आराखडा कसा बनवायचा तसेच भूमातेचे संवर्धन का व कसे करावे याबाबत विजय कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानातील शेतीसाठी लोकसभा याबाबत पाणी फाउंडेशनचे अविनाश पोळ यांनी मार्गदर्शन केले. पाऊस पाण्याचा ताळेबंद आणि जलसंधारण तसेच हवामान अनुकूल शेतीसाठी अर्थसहाय्य कसे मिळवायचे याबाबत सागर खटकाळे यांनी मार्गदर्शन केले. शेतामध्ये तंत्रज्ञानाची शाळा कशी बनवायची याबाबत अरुण जाधव यांनी माहीती दिली. शेतीवर आधारित उद्योगाबाबत कविता तागडे यांनी केले. बदलते हवामानात गावाची उभारणी करण्यासाठी ग्रामपंचायतीची जबाबदारी याबाबत पद्मश्री पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सरपंच लताबाई बहिरम, उपसरपंच मधुकर चौधरी, सदस्य पार्वताबाई गांगोडे, निवृत्ती ठाकरे, अशोक चौधरी, देविदास चौधरी, भिवंराज चौधरी, विठ्ठल चौधरी, धर्मा चौधरी, दिनकर बहिरम, मनोज चौधरी, भगवान चौधरी, गणपत झोटिंग, पुंडलिक पवार, दत्तात्रेय चव्हाण, विलास जोपळे, विजय चौधरी, कविता गवळी, द्रोपदा चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक संदीपकुमार बोरवे व ग्रामसेवक रंजना गावित यांनी परिश्रम घेतले.