महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी नराधमाला आजन्म कारावास

वणी l वार्ताहर :-नातेसंबंधाचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधमाला जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोन हजार रुपये दंड व तो न भरल्यास दोन महिने साधी कैद आणि पीडितेला दोन लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
        ही धक्कादायक घटना नोव्हेंबर २०२२ मध्ये कुर्णोली शिवारात घडली होती. बाळू यशवंत जाधव (४२, रा. धोंडमाळ, ता. पेठ) याने पीडितेच्या आई व भावाला जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. विशेष म्हणजे, पीडिता ही आरोपीची चुलत भाची होती. कामाच्या ठिकाणीच आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत पीडितेवर अत्याचार केले, त्यामुळे ती गर्भवती झाली आणि तिला मुलगाही झाला.
        दरम्यान, आरोपीकडून पीडितेला धमक्या देण्यात येत होत्या, मात्र तिने धैर्याने पुढे येत दिंडोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून ५ फेब्रुवारी २०२३ रोजी आरोपीला अटक केली. न्यायालयात दोषारोप पत्र सादर करताना सरकारी वकिलांनी ठोस पुरावे सादर केले. सर्व बाजू लक्षात घेत आरोपी बाळू जाधव याला न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठावली.
        या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळाला असून समाजात अशा गुन्हेगारांना धडा मिळावा, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने