maharashtratribalnews

आदिवासी कोकणा, कोकणी व कुकणा समाजाचे वैचारिक व सांस्कृतिक एकता महासंमेलन संपन्न



संपादक l कृष्णा पवार 
देवडोंगरी l शंकर निंबारे :-आदिवासी कोकणा, कोकणी व कुकणा समाजाचे २रे वैचारिक एकता व सास्कृतिक महासंमेलन (दि.२७) रोजी जव्हार येथील राजीव गांधी स्टेडियमवर संपन्न झाले. महाराष्ट्र, सिल्वासा, दादरानगर हवेली, गुजरात येथून हजारो कोकणा, कोकणी, व कुकणा समाज बांधव जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियमवर एकत्र आले होते.
    हनुमान पॉइंट येथील खंडेराव मंदिरापासून भव्य सांस्कृतिक महारॅलीला सुरवात झाली. रॅलीमध्ये कोकणा, कोकणी व कुकणा जमातीतील पारंपरिक देवदेवतांचे सादरीकरण, आदिवासी वाद्यांचा गजर, तारपा, पावरी नृत्य, सांबळ नृत्य, गौरी नाच तसेच महिलांनी डोक्यावर गौरी घेवून पारंपरिक पोशाखात सहभाग घेतला होता. नंतर राजीव गांधी स्टेडियम येथे भव्य वैचारिक व सांस्कृतिक महासंमेलनाचे उद्घाटन हिरवा देव व आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी यांची ११५ वी जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच देवधून त्रैमासिकचे प्रकाशन व वधू -वर सूचक ऑनलाईन अँप चे अनावरण करण्यात आले. यावेळी आदिवासी कोकणा, कोकणी, कुकणा इतिहास, कोकणा समाजाची सद्यस्थिती आव्हाने, संविधानातील आदिवासींचे संविधानिक, हक्क, समाज संघटन व संघटनेचे महत्व उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या मनोगतातून कोकणा समाजाने सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी एकजूट होण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी कोकणा सामाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व उच्च शिक्षण घेऊन पुढे आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. वैचारिक व सांस्कृतिक एकता महासंमेलनात कोकणा समाजातील डांगी नृत्य, पावरी नृत्य,डोंगऱ्यादेव नृत्य, तारपा नृत्य, कोकणा नृत्य( तापी) डेरा वाद्य, मांदळ नृत्य,विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच विविध वस्तू चे प्रदर्शन विक्री साठी स्टॉल लावण्यात आले होते.
सभेत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा.
     वैचारिक व सांस्कृतिक महासंमेलनाचा मुख्य उद्देश समाजातील अन्याय, अत्याचाराचा निषेध करणे तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर उपाययोजना करण्याचा होता. कोकणा समाजातील महिलांचे कुटुंब, व्यवसाय, नोकरी व राजकारणातील स्थान मजबूत करणे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समस्या आणि त्यावरील उपाययोजना. कोकणा समाजाच्या रूढी-परंपरा, सण-उत्सव, देवदेवतांची माहिती व जतन. युवक-युवतींच्या उच्च शिक्षणासाठी (NET, Ph.D., UPSC, MPSC, GPSC) योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहासंबंधी समस्या व उपाय तसेच आदिवासी भागातील विकास प्रकल्पांमुळे होणारे स्थलांतर आणि त्याचा कुटुंबांवर होणारा परिणाम. आदिवासी समाजातील आरोग्य, कुपोषण व गरिबी यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना. सदर वैचारिक व सांस्कृतिक एकता महासंमेलनामुळे आदिवासी कोकणा, कुकणी, कोकणी समाजातील बांधवांना नवचेतना मिळाली असून, समाजाच्या उन्नतीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजनसाठी आदिवासी कोकणा कोकणी कुकणा केंद्रीय कोर कमेटी व आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान ,पालघर व समस्त कोकणा समाजबांधव पालघर जिल्हा यांनी विशेष मेहनत घेतली.

फोटो
वैचारिक सांस्कृतिक एकता संमेलन महारॅलीत पारंपरिक नृत्य सादर करताना आदिवासी बांधव.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने