ननाशी l वार्ताहर:- ननाशी आणि आंबाड (ता. दिंडोरी) येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा योजना) टप्पा 2 अंतर्गत ग्राम कृषी विकास समिती सदस्य आणि स्वयंसेवकांसाठी वेबिनारद्वारे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. हे प्रशिक्षण ग्रामपंचायत कार्यालयात पार पडले. प्रशिक्षणादरम्यान उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना प्रकल्पाची ओळख, त्याचे विविध घटक, उपक्रम आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत माहिती देण्यात आली. तसेच, गावाचा सूक्ष्म आराखडा तयार करणे, हवामान अनुकूल शेतीसाठी लोकचळवळ उभारणे, शेतीपूरक व्यवसायांची संकल्पना, पर्जन्य ताळेबंद, जलसंधारण, जमिनीच्या आरोग्य संवर्धनाच्या पद्धती, हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती तंत्रज्ञान आणि ग्राम कृषी विकास समितीच्या जबाबदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी मंडळ कृषी अधिकारी संजय सावंत, आंबाडच्या सरपंच विमल चौधरी, ननाशीचे सरपंच दत्ता शिंगाडे, उपसरपंच शेखर देशमुख, ग्राम कृषी विकास समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, कृषी ताई, कृषी सहायक महेंद्र गवळी, ग्रामपंचायत कर्मचारी धनराज चौधरी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.