महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पिंपळपाडा शाळेच्या विकासासाठी पळसविहीर ग्रामपंचायतीचे मोलाचे योगदान


दिंडोरी l प्रतिनिधी:- शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा या उद्देशाने ग्रामपंचायत पळसविहीरने पिंपळपाडा जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व भौतिक गरजा लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच फुलाबाई मुरलीधर चौधरी आणि सर्व सदस्यांनी गाव विकास आराखड्यांतर्गत शाळेस आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.
      ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेतील सर्व वर्गांमध्ये डिजिटल ई-लर्निंग साहित्य बसवण्यात आले आहे. तसेच वर्गांची दुरुस्ती करण्यात आली असून, शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी किचन शेड नसल्याने शाळेच्या आवारातील नादुरुस्त व्यायामशाळेचे नूतनीकरण करून तात्पुरते किचन शेड उभारण्यात आले.
       विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार केला जातो. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेत तालुकास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस प्रदान करण्यात आले. जिल्हास्तरीय धावणे स्पर्धेत निवड झालेल्या रेखा शेवरे आणि चेतन भोये यांना स्पोर्ट्स ड्रेस आणि शूज देण्यात आले.
       गाव विकास आराखड्यांतर्गत शाळेच्या आवारात स्वच्छता राखण्यासाठी बारीक कचऱ्याचे व्यवस्थापन, पेव्हर ब्लॉक बसविणे, गुणवत्तापूर्ण रस्ता, नाली काँक्रिटीकरण, शोषखड्डा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नाडेप व गांडूळ खत प्रकल्प यासारखी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
       विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि सांस्कृतिक विकासासाठी उच्च प्रतीचे संगीत साहित्य व क्रीडा साहित्य पुरविण्यात आले. यात चार्जिंग साउंड सिस्टम, सोनी साउंड सिस्टीम, १०० लेझीम, १०० डंबेल्स, झांजरी, ट्रँगल, टाळ, माईक आदी साहित्यांचा समावेश असून, एकूण किंमत ९१,००० रुपये आहे. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळेल आणि त्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लागेल.
       या बहुमूल्य सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ललित गायकवाड, मुख्याध्यापिका योगिता गायकवाड, शिक्षक मनोहर कोतवाल, गोरक्षनाथ राऊत, आशा वळवी, सचिन वसमतकर, कावेरी भोये, विलास धुळेकर, कैलास जोपळे, रोहिदास झिरवाळ, यमुना कऱ्हाटे व इतर शिक्षक आणि समिती सदस्यांनी ग्रामपंचायत पळसविहीरचे मनःपूर्वक आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने