दिंडोरी । मनोज पाटील
शेतकर्यांसाठी 1 रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील महत्त्वाचे जोखीम घटक बंद केलेली योजना त्वरित सुरु करावी, शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याबाबत सातबारा कोरा करावा, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही करावी आदींसह विविध मागण्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज ढिकले, तालुकाध्यक्ष अमोल उगले यांच्या उपस्थितीत तहसिलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने मागील महिन्यात झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार शेतकर्याची एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला त्याच प्रकारे ऐनवेळी शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यास नकार दिला. यामुळे शेतकर्यांवर मोठा अन्याय झाल्याने सदर गोष्टीवर शासनाने प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून एक रुपया प्रधानमंत्री पिक विमा योजना त्वरित चालू करावी, शेतकर्यांचा सातबारा त्वरित कोरा करावा, मस्तजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख व आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही झाले पाहिजे. राज्यातील सुरक्षा सुव्यवस्थाबाबत जनसामान्यांमध्ये आता प्रश्न उभे राहू लागलेले आहे. राज्यातील दररोज मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. निष्पाप कार्यकर्त्यांचा जनसामान्यांचा बळी जात आहे. शेतकर्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मोठे आंदोलन सुरू राहील राज्यभरातून शेतकर्यांना घेऊन मोठे आंदोलन उभारू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. त्याचप्रकारे संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकर्यांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी मनसे जनहित कक्ष तालुकाध्यक्ष प्रफुल्ल कलवले, रोशन दिवटे, बाळु उदार, दिलीप जाधव, चेतन वडजे, किरण माळेकर, शुभम गायकवाड, धनंजय महाले यांच्यासह पदाधिकारी, महाराष्ट्र सेनेचे सैनिक, शेतकरी बांधव उपस्थित होते.