दिंडोरी । प्रतिनिधी
सुप्रसिद्ध कवी, बालसाहित्यिक व अभिनेते राजेंद्र उगले यांच्या ‘सुंदर माझे घर’ या बालकाव्य संग्रहाची इयत्ता चौथी ते पाचवी या वर्गासाठी प्रथम जिल्हा व नंतर राज्यस्तरावरून अंतिम निवड झाली.
महाराष्ट्र शासनाच्या ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद - पुणे’ यांनी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रंथालयांसाठी पुरविण्यात येणार्या ग्रंथासाठी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी लेखनस्पर्धेचे आयोजन केले होते. यात नाशिकचे सुप्रसिद्ध कवी, बालसाहित्यिक व अभिनेते राजेंद्र उगले यांच्या ‘सुंदर माझे घर’ या बालकाव्य संग्रहाची इयत्ता चौथी ते पाचवी या वर्गासाठी प्रथम जिल्हा व नंतर राज्यस्तरावरून अंतिम निवड झाली. महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा अनुदानातून हे पुस्तक छापले गेले असून त्याच्या 41500 प्रति महाराष्ट्रातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मोफत वितरित करण्यात आल्या आहेत. ‘सुंदर माझे घर’ या पुस्तकातून विद्यार्थी प्राणी, पक्षी, कीटक यांच्या घराबद्दलच्या सुंदर कविता अभ्यासणार आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन हे या पुस्तकाचे प्रवर्तक आहे. कवी राजेंद्र उगले हे त्यांच्या ‘थांब ना रे ढगोबा’ या बालसंग्रहाने प्रसिद्धीस आले तेव्हाच ही कविता शालेय अभ्यासक्रमात असावी असा आशावाद अनेक जाणकारांनी बोलून दाखविला होता. तो ‘सुंदर माझे घर’ या संग्रहाने खरा केला आहे.
प्रतिक्रिया - माझे एक स्वप्न आज पूर्ण झाले असून हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या हातात जात आहे, याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. अधिक सकसपणे लिहिण्याला बळ मिळाले आहे. माझ्या या यशात जिल्हा निवड समिती, राज्य निवड समिती, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचा मोलाचा वाटा असून या प्रक्रियेत असलेले सर्व अधिकारी व परीक्षक यांचे मी आभार मानतो.
*राजेंद्र उगले, बालसाहित्यिक*