maharashtratribalnews

चणकापूर आश्रमशाळेत ‘बाल संरक्षण प्रणाली’ कार्यशाळा उत्साहात संपन्न.

कळवण | प्रतिनिधी :- आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, चणकापूर येथे "आदिवासी आश्रमशाळा स्तरावर बाल संरक्षण प्रणाली स्थापन करणे" या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात पार पडली.
      ही कार्यशाळा अपेक्षा होमिओ सोसायटीच्या पुढाकाराने आणि आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. शाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक आणि अधीक्षिका यांना बालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा या उपक्रमाची सखोल माहिती देणे आणि बाल संरक्षण प्रणाली प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता.
     कार्यशाळेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये बालमैत्रीपूर्ण शाळेची संकल्पना, बाल संरक्षणाचे महत्त्व, POCSO कायदा 2012, बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, JJ कायदा 2015, RTE कायदा 2009 यांची माहिती, शाळा प्रशासनाची भूमिका, VCPC, CPC, SMC सारख्या समित्यांची अंमलबजावणी, Safe Touch vs Unsafe Touch, विद्यार्थ्यांचे समुपदेशन, मोबाईलच्या वापराचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम आणि मुलींच्या मासिक पाळीबाबत जागृती असे विषय समाविष्ट होते.
      कार्यशाळेचे सत्र सहायक प्रकल्प अधिकारी, कळवण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मार्गदर्शक म्हणून प्रकल्प अधिकारी भगवान निकम, प्रकल्प संचालक संजीवनी पवार, समन्वयक रवी राजनहिरे आणि ज्योत्स्ना मेहेकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
    या कार्यशाळेत अपेक्षा होमिओ सोसायटीचे सर्व मोबिलायझर्स, शाळेचे प्रमुख, अधीक्षक, अधीक्षिका तसेच विशाल तायडे, विकास आठवले, यश बुरबुरे, अक्षय पवार, लक्ष्मण चौधरी व भाग्यशाली भावळ हे कार्यकर्ते उपस्थित होते. यासोबतच विचार विकास सामाजिक संस्था, वरोरा आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळचे प्रतिनिधीही सहभागी झाले.
    कार्यशाळा माहितीपूर्ण, संवादात्मक व अनुभवाधारित होती. सहभागी शाळा प्रशासन व कार्यकर्त्यांनी बाल संरक्षण प्रणालीची जाणीवपूर्वक अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने