देवडोंगरी l शंकर निंबारे :- हरसुल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अर्थात "सामाजिक न्याय दिन" महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमापूजनाने साजरी करण्यात आले.
महाविद्यालयात प्राचार्य डॉ मोतीराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्वदेश फाऊंडेशनचे पदाधिकारी श्री खांडबहाले,श्री. बाळा माने हे होते.
महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. मोतीराम देशमुख यांनी "राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक,शैक्षणिक ,राजकीय, कृषी कार्यास उजाळा दिला". या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, "राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रमुख समाजसुधारक होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन, अस्पृश्य समाजाच्या एकूणच सामाजिक,शैक्षणिक कृषी क्षेत्रातील उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अथक प्रयत्न केल्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजा म्हणून ओळखतात.
त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना 'राजर्षी' ही उपाधी दिली. शाहू महाराजांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.अजय अहिर यांनी केले. याप्रसंगी, महाविद्यालयाच्या शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. मीनाक्षी पाटील, प्रा.कुणाल वाघ , प्रा. श्रीकृष्ण जाधव प्राध्यापक बंधु-भगिनी, कार्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्गही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.